ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डोंबिवली पूर्व भागातील एमआयडीसी परिसरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या परिसरातील आयसीआयसीआय बँकेची याच बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर आणि त्याच्या साथीदारांनी फसवणूक केली आहे. बँक खातेदारांच्या व्यवहारात बेकायदा आर्थिक उलाढाली करून बँकेची आणि खातेदारांची तीन कोटी ५७ लाख ४९ हजार १४१ रुपयांची फसवणूक केल्याचे आता समोर आले आहे.
ही फसवणूकीची बाब समोर आल्यानंतर आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक पवन अशोक माळवी यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात बँकेचे रिलेशन मॅनेजर आशीष याख्मी व त्याच्या इतर साथीदारांविरुध्द तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला असून, २०१९ पासून ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत डोंबिवली एमआयडीसीतील ममता रुग्णालयाशेजारील आयसीआयसीआय बँक शाखेत हा गैरप्रकार सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेचे रिलेशन मॅनेजर आशीष याख्मी आणि त्याच्या साथीदारांनी संगनमत करून आयसीआयसीआय बँक खातेदारांच्या परवानगीशिवाय ग्राहकांच्या खात्यात असलेल्या रकमा, त्यांच्या ठेव मुदतीच्या पावत्यांवर स्वतःचे मित्र, वडिल यांच्या नावे व्यवहार करून काही रकमा, पैसे काढून घेतले. ज्या ग्राहकांनी गुंतणुकीसाठी धनादेश दिले होते. त्या धनादेशांवर खाडाखोड करून, नावे बदलून, बनावट स्वाक्षऱ्या करून त्या धनादेशांवरील रकमादेखील लबाडीने स्वतःच्या नावे काढून घेतल्याचे समोर आले आहे. हे सगळे गैरव्यवहार सुरू असताना बँक आणि ग्राहकांना कोणताही सुगावा लागणार नाही याची काळजी आरोपी आशिष व त्याचे साथीदार घेत होते. ग्राहकांची खाती, त्यांच्या ठेव रकमांच्या बदल्यात आयसीआयसीआय प्रुडेन्शीअल पॉलिसी काढण्यात आल्या. बँकेच्या अंतर्गत तपासणीत हा सगळा गैरव्यवहार उघडकीला आला आहे.
याप्रकरणाची बँकेने स्वतंत्र चौकशी केली असून रिलेशन मॅनेजर याख्मी व त्याच्या साथीदारांनी हा गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. बँक आणि ग्राहकांची फसवणूक केल्याने बँकेने तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक अनिल पडवळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ICICI Bank 3 crore fraud Dombivali Employees