इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकत कसोटीत गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत अश्विनने सहा विकेट घेत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या कामगिरीमुळे तो कसोटीत गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याचवेळी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडला एका धावेने पराभव स्वीकारावा लागला होता. यासह अँडरसन गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
अश्विन 2015 मध्ये प्रथमच कसोटीत नंबर वन गोलंदाज बनला होता. तेव्हापासून तो सातत्याने पहिल्या क्रमांकावर येत आहे. 36 वर्षीय अश्विनने मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेत दिल्लीतील भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. यानंतर त्याने अॅलेक्स कॅरीलाही बाद केले. दुसऱ्या डावातही अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या पाचपैकी तीन विकेट घेतल्या, तर जडेजाने उर्वरित विकेट घेत ऑस्ट्रेलियाला छोट्या धावसंख्येवर गुंडाळले. अश्विन इंदूर आणि अहमदाबादमध्ये चांगली कामगिरी करू शकतो आणि दीर्घकाळ अव्वलस्थानी आपले स्थान मजबूत करू शकतो.
गेल्या तीन आठवड्यांत तीन वेगवेगळे गोलंदाज पहिल्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स फेब्रुवारीमध्ये कसोटीत अव्वल गोलंदाज होता, जेम्स अँडरसनने त्याला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. आता त्याच्याऐवजी अश्विनने फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. अँडरसनचे सात गुण कमी झाले असून तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता त्याचे 859 रेटिंग गुण आहेत. त्याच वेळी, अव्वल क्रमांकावर असलेल्या अश्विनचे 864 रेटिंग गुण आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 10 बळी घेणारा जडेजा गोलंदाजी क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. यासोबतच त्याने कसोटी अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानावर आपली पकड मजबूत केली आहे. अश्विन त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत इंग्लंडच्या जो रूटने दोन स्थानांची प्रगती करत आठव्या स्थानावर झेप घेतली आहे.
वेलिंग्टनमध्ये शानदार फलंदाजी करणाऱ्या रूटने कसोटी फलंदाजी क्रमवारीत ट्रॅव्हिस हेड आणि बाबर आझम यांना मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडच्या टॉम ब्लंडेलने वेलिंग्टनमध्ये शानदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला चार स्थानांचा फायदा झाला असून तो सातव्या स्थानावर आला आहे.
इंग्लंडचा युवा खेळाडू हॅरी ब्रूक आणखी एका शानदार शतकानंतर फलंदाजी क्रमवारीत विराट कोहलीसोबत 16व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याला 15 स्थानांचा फायदा झाला आहे.
पापुआ न्यू गिनीचा असद वाला पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 मध्ये बॅट आणि बॉल दोन्हीसह सुरेख फॉर्ममध्ये आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तो सातव्या स्थानावर आहे. स्कॉटलंडचा फिरकी गोलंदाज मार्क वॉट नेपाळमध्ये चार सामन्यांत १३ बळी घेत गोलंदाजांच्या क्रमवारीत १७व्या स्थानावर पोहोचला आहे.
ICC Test Ranking Indian Cricketer R Ashwin nomber 1 bowler