मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतात यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी (२७ जून) मुंबईतील एका कार्यक्रमात या सामन्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया सोबतत खेळणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. त्याचबरोबर १५ ऑक्टोबरला गट फेरीत भारताचा पाकिस्तान विरुद्धचा शानदार सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
१० शहरांमध्ये
विश्वचषकाचे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यात हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या शहरांचा समावेश आहे. हैदराबाद व्यतिरिक्त, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होणार आहेत.
१० संघ
या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी आठ संघ आधीच पात्र ठरले आहेत आणि उर्वरित दोन ठिकाणी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरी खेळली जात आहे, ज्यामध्ये सहा संघ सुपर सिक्समध्ये पोहोचले आहेत. यातील दोन संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या मुख्य फेरीत सहभागी होणार आहेत.
विश्वचषक राऊंड रॉबिन स्वरूपात
या विश्वचषकात सर्व संघ इतर नऊ संघांसोबत राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळतील. यापैकी गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि विजेते संघ अंतिम फेरीत खेळतील. मागच्या वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर इंग्लंड संघाने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला होता.
भारताचे सामने असे
तारीख…. विरुद्ध संघ…. ठिकाण
८ ऑक्टोबर… ऑस्ट्रेलिया…. चेन्नई
११ ऑक्टोबर…. अफगाणिस्तान…. दिल्ली
१५ ऑक्टोबर…. पाकिस्तान…. अहमदाबाद
१९ ऑक्टोबर…. बांगलादेश…. पुणे
२२ ऑक्टोबर…. न्यूझीलंड…. धर्मशाळा
२९ ऑक्टोबर…. इंग्लंड…. लखनौ
२ नोव्हेंबर…. क्वालिफायर-२ …. मुंबई
५ नोव्हेंबर…. दक्षिण आफ्रिका…. कोलकाता
११ नोव्हेंबर…. क्वालिफायर-१ बंगळुरू
१५ नोव्हेंबर…. सेमीफायनल-१ …. मुंबई
१६ नोव्हेंबर…. सेमीफायनल-२ …. कोलकाता
१९ नोव्हेंबर फायनल …. अहमदाबाद