मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतात यावर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी वेगवेगळी नाटके करणाऱ्या पाकिस्तानला आयसीसीने चांगलाच धडा दिला आहे. त्यांचे कुठलेही म्हणणे ऐकण्यात आलेले नाही. त्यामुळे ही बाब सध्या चर्चेची ठरत आहे.
यंदाच्या विश्वचषकाची सुरुवात अहमदाबाद येथे ५ ऑक्टोबरला इंग्लंड-न्यूझीलंड सामन्याने होणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहे. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईत तर दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला कोलकाता येथे खेळवला जाईल. त्याचवेळी १९ नोव्हेंबरला होणारा अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.
पाकिस्तानचा संघ भारतात येणार हेही निश्चित करण्यात आले आहे. याआधी हा संघ २०१६ मध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत शेवटचा भारत दौरा केला होता. मात्र, आयसीसीनेही पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. दोन सामन्यांचे ठिकाण बदलण्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी आयसीसी आणि बीसीसीआयने फेटाळून लावली आहे. ड्राफ्ट वेळापत्रक पाहिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची (पीसीबी) धुसफूस सुरू झाली, पण आयसीसीने त्यांना ठिकाण बदलून दिलेले नाही. पीसीबीने या दोन सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती.
पीसीबीने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांचे ठिकाण बदलण्याची मागणी केली होती. पाकिस्तानला २० ऑक्टोबरला बेंगळुरूमधील चिन्नास्वामी आणि २३ ऑक्टोबरला चेपॉक, चेन्नई येथे अफगाणिस्तानचा सामना करायचा आहे. चेन्नईतील परिस्थिती अफगाणिस्तानला अनुकूल होईल, असे पाकिस्तानने मागणी पत्रात नमूद केले होते. त्यामुळे स्थळ बदलणे पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरेल.
म्हणून ठिकाण बदलायचे होते
चेपॉक येथे चेंडू खूप फिरतो आणि अफगाणिस्तानकडे रशीद खान, मुजीब उर रहमान आणि नूर अहमद यांच्यासह जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत. जे पाकिस्तानसाठी मोठा धोका असू शकतात. तर, चिन्नास्वामी धावांसाठी ओळखला जातो आणि तिथे कोणत्याही धावसंख्येचा सहज पाठलाग करता येतो. दोन्हीपैकी एकाही सामन्यात ते फेव्हरिट म्हणून मैदानात उतरणार नाहीत, अशी भीती पाकिस्तानला होती. या कारणास्तव त्यांनी स्थळ बदलण्याची मागणी केली होती.
रंजक बाब
एवढेच नाही तर आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे पाकिस्तानने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांच्या ठिकाणांची अदलाबदल करण्याची मागणीही केली होती. या दोन सामन्यांसाठी ठिकाणांची अदलाबदल व्हावी अशी त्यांची इच्छा होती, म्हणजे पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाशी चेपॉक येथे आणि अफगाणिस्तानने चिन्नास्वामी येथे खेळावे. मात्र, आयसीसी आणि बीसीसीआयने पीसीबीची मागणी फेटाळून लावली. तसेच ठरवण्यात आले होते की, पाकिस्तानला आपले सामने नेमून दिलेल्या ठिकाणीच खेळवायचे आहेत.
पाकिस्तानचे सामने
पाकिस्तान संघ ६ ऑक्टोबरला क्वालिफायर-१ संघाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीनंतर पात्रता संघ निश्चित केला जाईल. पाकिस्तानला हैदराबादमध्ये दोन, अहमदाबादमध्ये एक, बेंगळुरूमध्ये दोन, चेन्नईमध्ये दोन आणि कोलकात्यात दोन सामने खेळायचे आहेत.
पाक संघाचे सामने असे
तारीख आणि सामन्याचे मैदान
६ ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर १ हैदराबाद
१२ ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर 2 हैदराबाद
१५ ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान अहमदाबाद
२० ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान बेंगळुरू
२३ ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान चेन्नई
२७ ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका चेन्नई
३१ ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश कोलकाता
४ नोव्हेंबर न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान बेंगळुरू
१२ नोव्हेंबर इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कोलकाता