लंडन – वेदना आणि सूज कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे बुप्रोफेन (Ibuprofen) औषध सुरक्षित असून, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना रुग्णावर याचा वापर केल्यास काहीच नुकसान झालेले नाही. जवळपास ७२ हजारांहून अधिक लोकांवर औषधाच्या वापराचा अभ्यास केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
संधिवाताच्या रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी बुप्रोफेन औषध दिले जाते. कोरोनाच्या सुरुवातीला रुग्णांना हे औषध देण्यावरून ब्रिटनमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. रुग्णांचे नुकसान होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली होती. त्यामुळे महामारीचे गांभीर्य वाढू शकते असा दावा करण्यात आला होता. या मुळे औषधाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ब्रिटनमध्ये श्वसनतंत्राच्या आजारांची तपासणी करणार्या संस्थेने रुग्णांच्या स्थितीचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादर केला आहे. कोविडरुग्णांना हे औषध दिले जाऊ शकते. त्यांच्यासाठी ते सुरक्षित आहे. या संस्थेचा अहवाल लॅसेंट ह्युमेटोलॉजी जर्नलने प्रसिद्ध केला आहे. हे औषध घेतलेल्या रुग्णांचा आणि न घेतलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याची संख्या सारखीच आहे. त्यामुळे या औषधामुळे वेगळे दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. हे औषध गंभीर झालेल्या रुग्णांना देण्यात आले होते. अशा रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर देण्याची गरज पडतच होती.