इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – झारखंडच्या खाण सचिव तथा सनदी अधिकारी पूजा सिंघल आणि त्यांचे पती अभिषेक यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. खुंटी येथील मनरेगा निधीच्या कथित गैरव्यवहार आणि इतर आरोपांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात सिंघल या सलग दुसऱ्या दिवशी ईडी समोर हजर झाल्या. पतीशी समोरासमोर चौकशी केल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.
अटकेनंतर दोघांचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. पूजा सिंघलच्या जवळच्या नातेवाईकांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) दोन दिवस चौकशीची फेरी सुरू होती. यापूर्वी पूजा सिंघलचे पती अभिषेक झा यांची ईडीने सलग दोन दिवस चौकशी केली होती. अभिषेक झा आणि त्यांच्या सीए सुमन यांनी विचारलेले प्रश्न आणि उत्तर या दोन्हीची नोंद घेण्यात आली आहे. अभिषेक झा यांच्याकडून त्यांची मालमत्ता, उत्पन्नाचे स्रोत, व्यवसाय आणि कुटुंबातील सदस्यांच्या उत्पन्नाशी संबंधित माहिती घेण्यात आली.
पूजा सिंघल यांनाही सरकारकडून सुट्टी मिळाली आहे. ती 30 मे पर्यंत रजेवर आहे. त्यांची रजा मंजूर करतानाच 2 पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्याची तयारी सुरू आहे. सोमवारी पूजा सिंघल यांनी विभागात रजेचा अर्ज केला होता. मनरेगा घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या ईडीला पैशाच्या स्रोताबाबत अनेक प्रकारची माहिती मिळाली आहे. डीएमओ दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांना खाण सचिव पूजा सिंघल यांचे संरक्षण असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये तैनात असलेल्या डीएमओ दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही अतिरिक्त पदभार देण्यात आला. ईडीच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली आहे की, डीएमओ दर्जाचे अधिकारी रांचीला मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन जात होते. सीए सुमन कुमार यांच्या फ्लॅटमधून खंडणीचा मोठा भाग जप्त करण्यात आला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बदली होऊनही पलामू येथील एका अधिकाऱ्याला उपसंचालक खाण पदावर कायम ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचवेळी, मासिक आधारावर देखील मोठ्या प्रमाणात वसुली झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.