नवी दिल्ली : देशातील कोरोना विषाणूची दुसरी लाट मोठया प्रमाणात वाढत असून हळूहळू रूग्णांच्या मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. बिहारमधील दोन आयएएस अधिकाऱ्यानाही कोरोना विषाणूची लागण झाली, त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल प्रशासनात चिंता व्यक्त होत आहे.
बिहारमधील आयएएस विजय रंजन (वय ५९) यांचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वीच त्यांना पटना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. ते पंचायती राज विभागात संचालक पदावर कार्यरत होते. तसेच वैशाली जिल्हा संरक्षण अधिकारी डॉ. ललन कुमार राय (६२) यांनीही कोरोनामुळे आत्महत्या केली. बिहारमध्ये मंगळवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची ४१५७ नवीन प्रकरणे नोंदली गेली. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, बिहारमधील भागलपूर, कटिहार आणि नालंदा येथे गेल्या २४ तासांत प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आणि अररिया, बांका, बेगूसराय, जहानाबाद, नवादा, पाटणा, शेखपुरा आणि सिवान येथे प्रत्येकी एक रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारी राज्यात मृतांची संख्या वाढून १६३० झाली.
बिहारमध्ये सोमवारी आणि मंगळवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची सर्वाधिक नवीन प्रकरणे समोर आली. त्यापैकी पटनामध्ये सर्वाधिक १२० नवीन रूग्ण आहेत. गेल्या वर्षी कोरोना साथीच्या आजाराची सुरुवात झाल्यापासून बिहारमध्ये संसर्ग झालेल्या लोकांची संख्या २९२३८५ वर पोहोचली असून त्यापैकी २६८६०६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामध्ये गेल्या २४ तासात बरे झालेल्या ६३६ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनी मंगळवारी पाटण्यातील कोविड हॉस्पिटल व नालंदा मेडिकल कॉलेज रुग्णालयात भेट दिली आणि रूग्ण आणि डॉक्टरांची भेट घेतली, तसेच वैद्यकीय व सुव्यवस्थेविषयी माहिती घेतली आणि आवश्यक सूचना दिल्या.