मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातत्याने बदली होण्यासाठी प्रसिद्ध असलेले आक्रमक अधिकारी तुकाराम मुंढे यांचे नागपूर सुटून आता तीन वर्षे झाली. पण तीन वर्षांनंतरही त्यांच्या मागची विघ्न सुटलेली नाहीत. नागपूरमध्ये महापालिका आयुक्त असताना त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
कोरोना काळात तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त होते. एकीकडे त्यांच्या डॅशिंग निर्णयप्रक्रियेमुळे नागपूरकर त्यांच्या प्रेमात होते. आणि दुसरीकडे सत्ताधारी भाजप त्यांच्यामुळे त्रस्त होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती व त्यांचे विशेष मैत्र असलेले संदीप जोशी हे नागपूर महानगरपालिकेत महापौर होते. त्यांना प्रमोट करून विधीमंडळात आणण्यासाठी फडणविसांचे प्रयत्न सुरू होते. अशा काळात मुंढे विरुद्ध जोशी असा सामनाच रंगला होता.
दोघेही कोरोना काळात लोकांची सेवा करत होते, पण एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात मुंढेंची लोकप्रियता वाढत गेली. त्याचा परिणाम काही महिन्यांनी झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर झाला. गेली कित्येक दशके भाजपकडे असलेली जागा काँग्रेसने जिंकली. पण मुंढेंना नागपुरात घालविण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यात त्यांच्यावर बेकायदेशीररित्या एका ठेकेदाराला २० कोटी रुपयांचे कंत्राट देणे आणि महिला कर्मचाऱ्यांनी कतेलेल्या तक्रारीची दखल न घेणे हे दोन आरोप लावले गेले. या आरोपांचा विषय मुंढेंच्या बदलीनंतर संपुष्टात आला होता. पण आता माहिती आयुक्तांनी तीन वर्षांत दोषींवर कारवाई का झाली नाही, असा सवाल करून मुंढेंवरील आरोपांची आठवण करून दिली आहे. दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
कोण जबाबदार?
कंत्राटदार आणि महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर तीन वर्षात कारवाई न झाल्याने याला जबाबदार कोण? अशी विचारणा करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश माहिती आयुक्त यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
त्यामुळेच झाली बदली
तुकाराम मुंढेंवर एका महिलेने केलेल्या आरोपानंतर तसेच सतत होणाऱ्या टीकेमुळे नागपूर महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात करण्यात आली होती. यानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तुकाराम मुंढे यांनी अचानक बदली का करण्यात आली असा सवालही केला होता.
IAS Officer Tukaram Mundhe Trouble Action
Information Commissioner Nagpur Delay