इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बिहार आणि झारखंडमध्ये मोठी कारवाई केली आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि झारखंडच्या खाण व उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. पूजा आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या दोन डझन ठिकाणांवर एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले आहे. छाप्यादरम्यान पूजा सिंघल यांचे पती आणि व्यावसायिक अभिषेक झा यांच्या चार्टर्ड अकाउंटंटकडून तब्बल 19 कोटी 31 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणांहून 150 कोटींहून अधिक गुंतवणुकीची कागदपत्रेही सापडली आहेत. मात्र, ईडीने अद्याप यासंदर्भात अधिकृत दुजोरा दिलेला नाही. शुक्रवारी पहाटे सुरू झालेली ईडीची ही कारवाई अद्यापही सुरूच आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमार यांच्या बुटी हनुमाननगर येथील सोनाली अपार्टमेंटमधून तब्बल 19.31 कोटींची रोख रक्कम मिळाली आहे. ही रक्कम कशी आली याची माहिती ईडी गोळा करत आहे. त्याचबरोबर ईडीचे अधिकारी गुंतवणुकीची कागदपत्रेही तपासत आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क साधण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सहा वाजता ईडीच्या पथकाने पाच राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यास सुरुवात केली. रांची, मुझफ्फरपूर, कोलकाता, दिल्ली आणि जयपूर येथे हे छापे टाकण्यात आले. ईडीचे सहसंचालक दर्जाचे अधिकारी कपिल राज यांच्या नेतृत्वाखाली रांचीमधील छापे टाकण्यात आले.
ईडीच्या वेगवेगळ्या पथकांनी रांचीमधील पूजा सिंघलच्या अधिकृत निवासस्थानावर, कानके रोडवरील पंचवटी रेसिडेन्सीच्या बी ब्लॉकमधील फ्लॅट क्रमांक 104, पूजा सिंघल यांचे पती तसेच सीए सुमन कुमार यांचे कार्यालय आणि निवासस्थानांवर छापे टाकले आहेत. अभिषेक झा यांचे पल्स हॉस्पिटल, सासरे कामेश्वर झा यांचे मिठनपुरा, मुझफ्फरपूर येथील निवासस्थान, पूजा सिंघल यांचे भाऊ आणि पालकांचे निवासस्थान, सीएचे एंट्री ऑपरेटर रौनक आणि प्राची अग्रवाल यांचे कोलकाता येथील निवासस्थान, राजस्थानचे माजी सहाय्यक अभियंता राजेंद्र कुमार जैन यांचे जयपूरमधील एकूण निवासस्थान असे दोन डझन ठिकाणी छापे टाकण्यात आलेत.
रांचीशिवाय देशातील अनेक महानगरांमध्ये जमीन, फ्लॅटमध्ये गुंतवणूक करण्यात आल्याचे समजते आहे. पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांच्या मालकीच्या रांची येथील पल्स हॉस्पिटलचीही महत्त्वाची माहिती ईडीला मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.