इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या कारवाईनंतर आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. पूजा सिंघल यांच्या झारखंडमधील घरातून जवळपास २० कोटी रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आले होते. नोटांची संख्या इतकी जास्त होती, की सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मोजण्यासाठी मशीन मागवाव्या लागल्या.
या छापेमारीनंतर सोशल मीडियावर पूजा सिंघल आणि त्यांचे पती अभिषेक झा यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात येत आहे. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल युजर्सना जाणून घेण्याची इच्छा आहे. दोघांच्या प्रेमाबद्दल आम्ही तुम्हाला काही माहिती सांगणार आहोत.
मीडियावर येणाऱ्या वृत्तांनुसार, झारखंड बॅचच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल आणि अभिषेक झा पहिल्यांदा फेसबुकवर भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर हळूहळू हे नाते आणखी फुलत गेले. त्या वेळी अभिषेक ऑस्ट्रेलियामध्ये एमबीए करत होते. ऑस्ट्रेलियातून एमबीए करून परतलेले अभिषेक आणि पूजा सिंघल एकाच जिममध्ये जाऊ लागले. तिथे त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली.
पूजा सिंघल यांनी अभिषेक झा यांच्यासोबत दुसरे लग्न केले आहे. त्यापूर्वी वरिष्ठ आयएएस अधिकारी राहुल पुरवार हे पूजा सिंघल यांचे पती होते. परंतु त्यांचे नाते जास्त दिवस टिकू शकले नाही. दोन ते तीन वर्षांतच दोघांच्या नात्यांमध्ये दरी निर्माण झाली आणि नंतर घटस्फोट झाला. त्याचदरम्यान पूजा सिंघल यांची अभिषेक झा यांच्यासोबत मैत्री झाली.
आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांचे यापूर्वीही भ्रष्टाचारात नाव आले होते. यापूर्वी अनेक घोटाळ्यांमध्ये त्यांचे नाव भ्रष्टाचारात समोर आले आहे. चतरा येथे उपायुक्त असताना मनरेगा योजनेत दोन स्वयंसेवी संस्थांना सहा कोटी रुपये देण्यासह खुंटी येथे मनरेगा योजनेत १६ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात त्यांचे नाव समोर आले होते. सक्तवसुली संचालनालय या प्रकरणाचासुद्धा तपास करत आहे. आता त्यांच्या घरातूनच २० कोटी रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.