भोपाळ (मध्य प्रदेश) – आयएएस अधिकारी अनुप कुमार यांनी समाजापुढे एक मोठा आदर्श घालून दिला आहे. खरे तर आई आपल्या मुलांसाठी जे करते त्याची परतफेड करता येत नाही. पण किमान आईसाठी काही करण्याची संधी मिळाली तर अनुप कुमार यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा, असे नक्कीच म्हणता येईल. कारण आईची सेवा करता यावी म्हणून त्यांनी चक्क जिल्हाधिकारी पदच सोडले.
जिल्हाधिकारी होणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण, या पदापेक्षा आजारी आईची सेवा करणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे होते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी दिवस–रात्र आईची सेवा केली. ३५ दिवस त्या ग्वाल्हेरच्या रुग्णालयात भरती होत्या. मात्र मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले.
मध्य प्रदेश कॅडरचे २०१३ सालचे अनुप कुमार सिंह हे जबलपूरमध्ये अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच मध्य प्रदेश सरकारने त्यांना दमोह येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र आजारी आईची सेवा करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच मिळत असलेले जिल्हाधिकारी पदही नाकारले आणि रुजू होण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सरकारला कळवले. विशेष म्हणजे त्यांची परिस्थिती समजून घेत सरकारने आदेशांमध्ये बदल करीत जबलपूरमध्येच त्यांना कायम ठेवले.
कानपूरचे रहिवासी आहेत
आयएएस अनूप कुमार उत्तर प्रदेशच्या कानपूरचे रहिवासी आहेत. त्यांचे एक घर इटावा येथेही आहे. आजारपणात त्यांची आई इटावा येथेच मुक्कामाला होती. त्यांच्या कुटुंबात वडील आणि तीन बहिणी आहेत. एका बहिणीची लग्न झाले आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये अनूप कुमार ग्वाल्हेरमध्ये अव्वल जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले.
आई व्हेंटिलेटरवर होती
१३ एप्रिल ला त्यांच्या आईची प्रकृती खालावली. त्यानंतर ग्वाल्हेर येथे एका खासगी रुग्णालयात आईला भरती करण्यात आले. सुरुवातीला त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली. काही दिवसांनी त्या पॉझिटीव्ह आल्या. पण पुढे कोरोनातून बाहेर पडल्या होत्या. गेल्या नऊ दिवसांमध्ये त्यांची आई व्हेटिलेटरवर होती आणि त्यांचे डायलिसीस सुरू होते. डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.