पाटणा (बिहार) – अधिकारी ऐकत नाहीत म्हणून त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केल्याचे आपण ऐकतो. अधिकाऱ्यांची बदली करून शिक्षेवर नक्षलग्रस्त भागात पाठविल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. मात्र एका अधिकाऱ्याने चक्क मुख्यमंत्र्याविरुद्धच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. नितीश यांचे समर्थक वगळता संपूर्ण देशातून या अधिकाऱ्याच्या हिंमतीचे सारेच कौतुक करीत आहेत.
१९८७ च्या बॅचचे आयएएस सुधीर कुमार यांनी गर्दनीबाग पोलीस ठाण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पण ही तक्रार स्वीकारल्याची पावती घेण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनच्या बाकावर चार तास बसवून ठेवण्यात आले. याला बिहारी स्टाईल म्हणतात. या तक्रारीत अधिकाऱ्याने नितीश कुमार यांच्यासह अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांच्याही नावाचा उल्लेख केला आहे.
प्रकरण फसवणुकीशी संबंधित आहे. यात त्यांनी पाटन्याचे भूतपूर्व एसएसपी मनू महाराज यांच्याही नावाचा उल्लेख केला आहे. ज्या अधिकाऱ्याने तक्रार केली आहे ते पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होणार आहेत आणि नोकर भरती घोटाळ्यात त्यांचे नाव असल्यामुळे सेवेत असताना तीन वर्षे तुरुंगवास भोगून चुकले आहेत. गेल्यावर्षीच आक्टोबरमध्ये त्यांना जामीन मिळाला होता. त्यांनी कागदपत्रांमधील फसवणुकीच्या घोटाळ्यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मार्चमध्येही ते अश्याचप्रकारची तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते, तेव्हाही त्यांनी असेच बाकावर बसवून ठेवण्यात आले होते. याशिवाय जुन्या तक्रारीचे काय झाले हे माहिती अधिकारात देखील कळू शकले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.