मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केली आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्या क्रूझमध्ये शनिवारी रात्री छापा टाकून एनसीबीने रेव्ह पार्टीवर कारवाई केली होती. त्यादरम्यान आर्यन खान तिथे उपस्थित होता. आर्यनसह आठ जण ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत आहेत. आता सर्वांची चौकशी सुरू आहे. क्रूझवर पार्टी करण्यासंदर्भात पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यादृष्टीने आता पोलिसांनीही तपास सुरू केला आहे.
कोठडी मिळल्यानंतर एनसीबीने आर्यनच्या चौकशीला सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वडील शाहरूख खान यांना भेटण्यासाठीसुद्धा आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते, असा खुलासा आर्यनने चौकशीदरम्यान केल्याने सगळेच हैराण झाले. वडील इतके व्यग्र असतात की मला त्यांची व्यवस्थापक पूजा यांच्याकडून भेटण्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, असे आर्यनने चौकशीदरम्यान सांगितले. त्याने परदेशातून चित्रपटनिर्मितीचे शिक्षण घेतल्याचीही माहिती एनसीबीला दिली आहे.
एनसीबीने आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. त्यात आर्यन खानसह ८ जणांचा समावेश आहे. त्यात अरबाझचा मित्र श्रेयस, एकाला जोगेश्वरी येथून तसेच एकाला ओडिशा येथूल अटक केली आहे. एनसीबीने अरबाझ मर्चंट, मुनमून धनिजा, विक्रांत छोकर, इश्मीत सिंह, नुपूर सारिका, गोमित चोपडा आणि मोहक जयस्वाल यांना यापूर्वीच अटक केलेली आहे. तसेच दोन ड्रग्ज पुरवठादारांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. आर्यन खानवर एनडीपी ८ सी, २०बी, २७ आणि ३५ कलम लावण्यात आले आहेत. या कलमांतर्गत ड्रग्जचे सेवन करणे, जाणीवपूर्वक ड्रग्ज घेणे आणि ड्रग्ज खरेदी करण्यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.