इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काही महिन्यांपूर्वी मुंबई नजिक एका क्रूजवर झालेल्या रेव्ह पार्टीमुळे देशभरात मोठी खळबळ निर्माण झाली होती, यामध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला देखील अटक करण्यात आली होती. हे प्रकरण थंडावत नाही, तोच आता पुन्हा एकदा हैदराबाद शहरातील रेव्ह पार्टीचा भयानक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीला अटक करण्यात आली आहे.
हैदराबादमध्ये एका रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झाला असून सुमारे 142 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात अनेक व्हीआयपी आणि अभिनेते, राजकारण्यांच्या मुलांचाही समावेश आहे. हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्सच्या पथकाने बंजारा हिल्स भागातील एका पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये मद्यधुंद पार्टीचा पर्दाफाश केला.
पोलिसांनी येथून कोकेन आणि ड्रग्ज यांसारखे प्रतिबंधित मादक पदार्थ जप्त केले आहेत. मेगास्टार चिरंजीवीची भाची आणि अभिनेता नागा बाबूची मुलगी निहारिका कोनिडेला हिलाही येथून ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, आपल्या मुलीचा ड्रग्जशी काहीही संबंध नसल्याचा व्हिडीओ नागाबाबूने जारी केला आहे. यापूर्वी पोलीस याबाबत माहिती देत नव्हते, मात्र एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निहारिकालाही ताब्यात घेतल्याबद्दल त्यांना सांगावे लागले.
बिग बॉस तेलुगू रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता गायक राहुल सिपलीगुंज याचाही अटकेत असलेल्यांमध्ये समावेश आहे. विशेष बाब म्हणजे हैदराबाद पोलिसांनी १२ फेब्रुवारीला लाँच केलेले ड्रग्ज व्यसनाच्या विरोधात एक गाणे राहुल सिपलीगुंजने गायले होते.
तसेच या संशयितांमध्ये आंध्र प्रदेशच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मुलगी देखील होती. याशिवाय तेलुगु देसम पक्षाच्या खासदाराचा मुलगाही रेव्ह पार्टीत पोहोचला होता. तेलंगणा काँग्रेसचे नेते अंजन कुमार यादव यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी पबमध्ये गेला होता. मात्र आपल्या मुलाला खोटे गोवले जात आहे. त्यामुळे शहरातील सर्व पब बंद करावेत.
दरम्यान, या निष्काळजीपणाबद्दल बंजारा हिल्सचे एसएचओ शिव चंद्रा यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जागी टास्क फोर्समधील के नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपासून पोलिसांनी ड्रग्जविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. काही दिवसांपूर्वी एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा अंमलीपदार्थाच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता.