विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाविरोधात लढा देताना देशातील प्रत्येक संस्था आपल्या परिने योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात आता हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आयआयटी) भर पडली आहे. कोरोनानंतर वेगाने वाढणाऱ्या काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) आजारावर उपचार करण्यासाठी आयआयटी हैदराबादने तोंडावाटे देणाऱ्या औषधावर संशोधन केले आहे. ६० मिलिग्रॅम औषध बाधित रुग्णाला देता येणार आहे. हे औषध शरीरातील नेफ्रोटॉक्सिसिटीला (मूत्रपिंडावर औषधे आणि रसायनांचा दुष्परिणाम) कमी करते. औषधाची किंमत साधारण २०० रुपये असेल.
काळ्या बुरशीवर सध्या अॅम्फोटेरेसिन बी हे इंजेक्शनच उपचारार्थ वापरले जात आहे. ते महाग असून ते अधिक प्रमाणात द्यावे लागतात. त्यामुळे आता हे अत्यल्प किंमतीत उपलब्ध झालेले औषध काळ्या बुरशीच्या रुग्णांसाठी वरदानच ठरणार आहे.
काळ्या बुरशीवर प्रभावी नॅनोफायब्रस एएमबी औषधावर रासायनिक इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक सप्तर्षी मुजूमदार आणि डॉ. चंद्रशेखर शर्मा यांनी संशोधन केले आहे. जवळपास दोन वर्षांच्या संशोधनानंतर औषधाला मोठ्या औषधनिर्माता कंपनीशी भागिदारी करून व्यापक स्वरूपात उत्पादित करण्यासाठी आयआयटी संशोधकांनी मान्यता दिली असून योग्य औषध निर्माता कंपनीला ती सोपविली जाणार आहे.
सध्या काळ्या बुरशीवर उपचार करण्यासाठी कालाजारच्या उपचाराचा वापर केला जात आहे. या औषधाची उपलब्धता आणि परवडणारी असल्याने आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली पाहिजे असे संशोधकांचे म्हणणे आहे. या औषधाचे व्यापक स्तरावर उत्पादन व्हावे तसेच लोकांना परवडणार्या दरात उपलब्ध होण्यासाठी या औषधाला तांत्रित बौद्धिक संपदेच्या अधिकारातून मुक्त करण्यात आले आहे.