इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी हायड्रॉलिक जॅकने चक्क तीन मजली इमारत उचलण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार झाला त्यावेळी इमारतीच्या आत १६ जण होते. त्यांना या सर्व प्रकाराची कुठलीही माहिती नव्हती. त्यामुळे या सर्व प्रकाराची सध्या देशभरात चर्चा होत आहे.
कुथबुल्लारपूरच्या चिंतल गावात ही घटना घडली आहे. येथे तीन मजली इमारत उचलण्यासाठी हायड्रॉलिक जॅक वापरण्यात आला. आश्चर्यकारक म्हणजे, या इमारतीत सुमारे १६ व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांना कुठलीही माहिती न देता ही संपूर्ण घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हायड्रॉलिक जॅकने इमारतीला उचलत असताना इमारत थोडीशी झुकली आणि तिचा काही भाग शेजारील निवासी अपार्टमेंटवर पडला. सुदैवाने या काळात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
घटनेची माहिती मिळताच हैदराबाद महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. इमारतीतील सर्वांना सुरक्षित बाहेर काढले आहे. या प्रकरणात काही जिवीतहानी होऊ शकली असती म्हणूनच पथकाने इमारत मालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजारच्या व्यक्तींनीही याप्रकरणी महापालिकेकडे तक्रार केली आहे.
इमारतीच्या मालकाने कुठलीही परवानगी न घेतला हा सर्व प्रकार केला आहे. महापालिकेच्यावतीने रस्त्यांची कामे केली जात आहे. या कामांमुळे इमारतीत पुराचे पाणी साचण्याची भीती आहे. त्यामुळेच या इमारत मालकाने ३२ वर्षे जुनी ही इमारत थेट उचलण्याचा पराक्रम या मालकाने केला आहे. आणि हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर आता हा मालक अडचणीत आला आहे. दरम्यान, इमारत उचलत असताना शेजारच्या इमारतीचे थोडे नुकसान झाले आहे.