लंडन (इंग्लंड) – दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकतूम यांना इंग्लंड उच्च न्यायालयाने माजी पत्नी आणि दोन मुलांना ५,५५० कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. जॉर्डनचा राजा अब्दुल्ला यांची सावत्र बहीण राजकुमारी हया बिन्त अल हुसेन आणि दांपत्याच्या दोन्ही मुलांच्या आयुष्याभराची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही रक्कम देण्याचा निर्णय दिल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
न्यायाधीश म्हणाले की, सुरक्षेशिवाय त्या काहीही मागत नाहीये. तीन महिन्यांच्या आत हया यांना त्यांच्या ब्रिटिश हवेलीच्या देखरेखीसाठी एकरकमी २५२५ कोटी रुपये देण्याचे आदेश शेख यांना दिले आहेत. संयुक्त अरब अमिराचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान शेख यांना १४ वर्षांच्या जलिला हिच्या शिक्षणासाठी ३० कोटी रुपये आणि ९ वर्षांच्या जायद आणि ९६ कोटी रुपयांची थकबाकी देण्यास सांगण्यात आले होते. त्यांना मुलांच्या संगोपनासाठी तसेच वयस्क झाल्यावर त्यांच्या सुरक्षेसाठी वार्षिक ११२ कोटी रुपयांचे भरपाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते.
हत्येचा कट?
जवळपास सात तास साक्ष देण्यादरम्यान ४७ वर्षांच्या हया म्हणाल्या, की एकरकमी भरपाई दिल्यास शेख यांच्या आणि त्यांच्या मुलांवरील दावा आपोआप निरस्त होईल. मी खरोखरच स्वतंत्र होऊ इच्छिते. आणि मुलांनी सुद्धा स्वतंत्र व्हावे हीसुद्धा इच्छा आहे. एप्रिल २०१९ मध्ये हया यांनी ब्रिटनमध्ये पलायन केले होते. ब्रिटनला पोहचल्यानंतर त्यांनी शेख यांना एका महिन्याच्या आत घटस्फोट देण्याची मागणी केली होती. शेख आपल्या हत्येचा कट रचत आहे, असा आरोपही हया यांनी केला होता. इंग्लंड येथील एका न्यायालयाने निर्णय देताना म्हटले होते की शेख यांनी हया यांना भीती घालून धमकावले होते. या प्रकरणाशी संबंधित हा आर्थिक करार आहे.