कानपूर (उत्तर प्रदेश) – “जा कोमल, आजपासून तुझा प्रियकर तुझा पती असेल. आता सुखात राहा. दोघे मिळून नवीन आयुष्य सुरू करा. तुलासुद्धा हेच हवे होते. मी आता तुला या बंधनातून मुक्त करत आहे”. हे संवाद कोणत्याही चित्रपटातील नाहीयेत. ही खरी घटना आहे. बर्रा येथील पती पंकज शर्मा यांनी आपल्या पत्नीचा विवाह तिचा प्रियकर पिंटू सिंह याच्याशी लावून दिल्याची घटना घडली आहे.
येथील आशा ज्योती केंद्रात शुक्रवारी एक वेगळीच घटना समोर आली आहे. पती पंकज समोर पत्नी प्रियकराशी सात जन्माच्या गाठी बांधत होती. प्रियकर आपल्या आयुष्यात आल्याने पत्नी खूपच आनंदित होती. तर पतीच्या डोळ्यासमोर २ मे २०२१ रोजी पत्नी कोमलशी विवाहबंधनात अडकल्याची घटना तरळत होती. आज त्याच कोमलला पतीने प्रियकराकडे सोपवून दिले.
शालेय जीवनापासून प्रेमसंबंध
ही गोष्ट प्रतापपूर सचेंडी या गावातून सुरू झाली. येथील कोमल शर्मा आणि चकरपूर मुरलीपूर येथील पिंटू सिंह हे दोघेही भौंती गावाजवळील महाविद्यालयात शिकत होते. नवव्या वर्गात असताना दोघांचे एकमेकांवर प्रेम जुळले. कोमलने बीएससीपर्यंत शिक्षण घेतले. तर पिंटूने शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल विषयात पदविकेचे शिक्षण घेतले. नोकरी मिळाल्यानंतर दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. परंतु कोमलच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न बर्रा आठ येथील पंकज शर्मा याच्याशी लावून दिले. लग्नानंतरही पिंटू आणि कोमलमध्ये प्रेमसंबंध कायम होते. दोघांमध्ये मोबाईलवर बोलणे सुरूच होते.
करवा चौथपूर्वी पलायन
लग्नानंतर कोमल पती पंकजसोबत गुडगावला गेली. तिथे पंकज एका कंपनीत कॉम्प्युटर स्पेशलिस्ट पदावर काम करत होते. तिथेसुद्धा पत्नी कोमलचे प्रियकराशी फोनवर बोलणे सुरू होते. त्यावरून पंकज यांनी तिला विचारले होते. अखेर पिंटूशी प्रेमसंबंध असल्याची कबुली कोमलने रक्षाबंधनाच्या दिवशी पतीसमोर दिली. पंकज यांनी ही गोष्ट त्याच्या मेहुण्यांना सांगितली. त्यानंतर कोमल माहेरी गेली. करवा चौथच्या दोन दिवसांआधीच कोमल २१ तारखेला माहेरून आपल्या सासरी गेली. सासरहून २२ ऑक्टोबरला कल्याणपूरला मैत्रीणींकडे जात असल्याचे सांगून ती गायब झाली. पंकज यांनी मेहुण्यांसोबत जाऊन पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली.
मला प्रियकरासोबत राहायचे आहे…
पोलिसांनी तपासादरम्यान पिंटूची चौकशी केली. त्यानंतर कोमल डीसीपी रविना त्यागी यांच्याकडे पोहोचली. तिथे तिने एक पत्र देऊन प्रियकरासोबत राहू द्यावे अशी विनंती केली. सासर आणि माहेरहून जीवाला धोका आहे असे तिने सांगितले. आशा ज्योती केंद्राच्या पोलिस उपनिरीक्षक निधी गुप्ता यांनी तपास सुरू केला. तिन्ही बाजूंच्या लोकांना पाचारण केले. पिंटूनेसुद्धा सोबत राहण्याचे तसेच लग्न करणार असल्याचे सांगितले. अखेर पती पंकज आणि तिच्या भावांनी याला मान्यता दिली आणि पंकज यांनी पत्नीचे लग्न पिंटूसोबत लावून दिले.