इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमधील अरावली जिल्ह्यात एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. एक व्यक्ती रुसलेल्या पत्नीला भेटायला तिच्या माहेरी गेला होता. सासरी पोहोचलेल्या व्यक्तीने पत्नीला मिठी मारत शरीरावर बांधलेल्या जिलेटिनच्या कांड्याने स्वतःला उडवले. या स्फोटात पती आणि पत्नीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे प्रकरण गुजरातमधील अरावली जिल्ह्यातील आहे. येथील ४५ वर्षीय लाला पागी नावाच्या व्यक्तीची पत्नी शारदा काही महिन्यांपूर्वी माहेरी गेली होती. यादरम्यान ती अहमदाबादपासून १३५ किमी दूर मेघराज गावात आपल्या वडिलांसोबत राहात होती. पागीचे शारदासोबत २२ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक २१ वर्षांचा मुलगाही आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पागी गुरुवारी रात्री नऊ वाजता शारदाच्या माहेरी पोहोचला होता. सासरी शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याने ती पुन्हा सासरी जाण्यास इच्छुक नव्हती. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या कुटुंबीयांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु परिस्थिती आणखी चिघळत चालली होती.
या प्रकरणी महिलेचा भाऊ भवनने आरोप केला की, सासरच्या मंडळींकडून शारदाचा छळ होत असल्याने ती दीड महिन्यापूर्वी घरी परत आली होती. शारदाचा सासरी मानसिक आणि शारिरीक छळ केला जात होता.शारदाच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार, लाला पागी मेघराजमध्ये पोहोचल्यावर बीटी छपरा या त्यांच्या परिसरातील त्यांच्या घरी पोहोचला, तेव्हा शारदा घरातून बाहेर आली. त्यानंतर पागीने तिला मिठी मारली. त्यानंतर एक जोरदार स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या स्फोटाचा आवाज जवळच्या इसारी पोलिस ठाण्यापर्यंत ऐकू आली. इसारी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सी. पी. वाघेला यांच्या माहितीनुसार, स्फोटानंतर पागी आणि शारदाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. लाला पागीने ही स्फोटके कुठून आणली, जिलेटिनच्या कांडीचा वापर तो कुठे शिकला याचा तपास पोलिस करत आहेत.