इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात काहीही घडू शकतं. कोणाला काहीही वाटू शकतं. म्हणून तर चांगला चाललेला संसार मोडून एका महिलेला घराबाहेर पडावं वाटलं. उत्तर प्रदेशमध्ये हा प्रकार घडला आहे. तीन मुले आणि व्यवस्थित संसार सुरू असलेली एक बाई आपल्याच मैत्रिणीच्या प्रेमात पडली, आणि तिन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडली आहे. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर समोर आलेल्या या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला असून या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रकरण?
मैनपुरीच्या कुरावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हविलिया गावातील हे प्रकरण आहे. येथे राहणाऱ्या संजीव यांची पत्नी खुशबू हिची सहा महिन्यांपूर्वी अशोक कुमार यांची मुलगी वंदना हिच्यासोबत भेट झाली. त्यानंतर वंदना सतत खुशबूच्या घरी येऊ लागली. इतकंच नाही तर वंदना खुशबूला तिच्यासोबत फिरायला घेऊन जायची. या वंदनाची खुशबूला एवढी सवय झाली की, तिचं वंदनावर प्रेम बसलं. याच प्रेमात खुशबू हिने चक्क आपला चांगला चाललेला संसार मोडला आणि तीन मुलांना घेऊन घराबाहेर पडली. वास्तविक खुशबूचा नवरा संजीव याला वंदना आवडत नव्हती. त्यामुळे या दोघींच्या भेटीला त्याचा विरोध होता. खुशबूने घर सोडले तेव्हा वंदनाही तिच्या घरी नसल्याचे कळले. त्यामुळे खुशबूचा पती संजीव यांनी कोतवाली कुरवली येथे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली तर दुसरीकडे वंदनाचे वडील अशोक कुमार यांनी बिछवां पोलीस ठाण्यात आपली मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.
दोघींचे नातेवाईक शोधत असताना अचानक वंदना आणि खुशबू मुलांसह बिछवां पोलीस ठाण्यात पोहोचल्या. आपण स्वतःच्या इच्छेने घरातून पळून गेल्याचं दोघींनी पोलिसांना सांगितलं. सध्या ती दिल्लीला लागून असलेल्या नोएडातील सूरजपूरमध्ये राहते. तेथीलच एका खासगी कंपनीत ती कामाला असून तिन्ही मुलेही एकत्र राहत आहेत. या घटनेची माहिती मिळताच दोघांच्या नातेवाईकांनीही पोलीस ठाणे गाठलं. या दोघींनीही आपापल्या घरी जाण्यास स्पष्ट नकार दिला. खुशबूने देखील पती संजीवसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला. वंदनाच्या भावालाही बहिणीला घरी घेऊन जायचं होतं, पण ती कोणाचंही ऐकायला तयार नव्हती. दोघींचं एकमेकींवर प्रेम असून आता आयुष्यभर एकमेकींसोबत राहणार असल्याचं खुशबू आणि वंदना सांगतात.