कानपूर (उत्तर प्रदेश) – पती-पत्नीच्या भांडणाला कोणताही विषयी पुरेसा असतो, असे म्हणतात. अगदी किरकोळ कारणावरून देखील पती पत्नीचे भांडण होऊ शकते. परंतु शक्यतो हे भांडण रात्री लगेच मिटते. मात्र काही वेळा थोडेसे ताण तणाव निर्माण होतात, परंतु एक-दोन दिवसात किंवा आठवडाभरात भांडण किंवा अबोला मिटतो. परंतु उत्तर प्रदेशातील एका गावामध्ये रात्रीच्या वेळी बेडरूममध्ये पती-पत्नीचे किरकोळ कारणावरून भांडण झाले आणि पत्नीने चक्क पोलिसांनाच बोलावले.
कांकरखेडा परिसरातील एका गावात, एका विचित्र प्रकरणावरून जोडप्यातील भांडण उघडकीस आले आहे. बेडरूममध्ये इलेक्ट्रिकल बोर्डवरील बटन (स्विच ) चालू आणि बंद करण्याबाबत दाम्पत्यामध्ये वाद झाला. वाद इतका वाढला की दोघांमध्ये शिवीगाळ झाली. वास्तविक पत्नी आठ महिन्यांची गर्भवती असून तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे लग्न झाल्यापासून, जोडप्यामध्ये भांडण चालू असते, कधी घरातील छोट्या छोट्या गोष्टीवरून तर कधी किरकोळ कारणावरून भांडणे होतात. जोडपे दोन दिवसांपूर्वी त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. झोपेत असताना पतीने वीजेचा स्विच बंद केला. त्याच वेळी संतापलेल्या पत्नीने उठून स्विच चालू केला. ऑन-ऑफ स्विचवरून या जोडप्याने एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रात्री जोडप्याचे नातेवाईक आणि शेजारी जमले त्यानंतर लोकांच्या समजुतीवर हे जोडपे शांत झाले.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी पुन्हा स्विच ऑन केल्यानंतर जोडप्यामध्ये भांडण झाले. त्यानंतर पत्नीने फोन करून तिच्या माहेरच्या नातेवाईकांना बोलावले. तेव्हा पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीला पोलीस कोठडीत टाकले. घरगुती कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत असल्याचे पोलीस ठाण्याचे म्हणणे आहे.