इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारमध्ये पतीने दोन पत्नींमध्ये विभाजन केल्याची घटना समोर आली आहे. बिहारमधील पूर्णिया पोलिस कौटुंबिक समुपदेशन केंद्राने या प्रकरणी निर्देश दिले आहेत की पतीला पहिल्या पत्नीसोबत १५ दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत महिन्याचे उर्वरित १५ दिवस राहावे लागेल. आधीच विवाहित असून आणि ६ मुलांचा बाप असूनदेखील त्याने दुसरे लग्न केले आहे.
नवऱ्याच्या विभागणीची कथा तुम्ही आत्तापर्यंत चित्रपटांमध्ये ऐकली असेल. मात्र बिहारमधील पूर्णिया पोलीस कुटुंब समुपदेशन केंद्राचा हा निर्णय चर्चेत आहे. बिहारमधील भवानीपूर पोलीस ठाण्यातील गोदियारी येथे राहणाऱ्या एका महिलेने आरोप केला होता की, तिच्या पतीचे आधी लग्न झाले असतानाही फसवून त्याने तिच्याशी दुसरे लग्न केले आहे. या महिलेचे म्हणणे आहे की, जेव्हा तिला त्याच्या पहिल्या लग्नाविषयीची माहिती समजली, त्यानंतर त्याने काढता पाय घेतला. तिच्यासोबत न राहण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यामुळे त्या महिलेने तक्रार केली. हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रात गेले आणि पतीला १५ दिवस दोन्ही पत्नींसोबत राहण्याचे निर्देश देण्यात आले. एवढेच नाही तर दोन्ही पत्नींनी हा निर्णय आनंदाने स्वीकारला आहे.
दुसरीकडे समुपदेशन केंद्राचे सदस्य दिलीपकुमार दीपक यांनी ही बाब समजल्यानंतर आमच्यासमोर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती दिली. आम्ही दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि त्यानंतर पोलिस कौटुंबिक समुपदेशन केंद्राच्या सदस्यांनी पतीला दोन्ही पत्नींसोबत राहावे लागेल असा निकाल दिला. याशिवाय दोघांची जबाबदारीही त्याला पार पाडावी लागणार आहे.
समुपदेशन केंद्राने आपल्या सूचनांमध्ये म्हटले आहे की, पतीला दोन्ही पत्नींसोबत वेगळ्या घरात राहावे लागेल. या संपूर्ण प्रकरणात दोन्ही पक्षांकडून बॉण्ड करण्यात आला आहे. जेणेकरून पुढे या निर्णयात बदल केला जाणार नाही. या निर्णयाबाबत आता पती आणि दोन पत्नींमध्ये समाधान दिसून येत आहे. कौटुंबिक समुपदेशन केंद्राचे सदस्य दिलीप कुमार यांनी सांगितले की, शुक्रवारी पोलिस कौटुंबिक समुपदेशन केंद्रात एकूण ३२ प्रकरणे आली होती. ज्यामध्ये सहा प्रकरणांमध्ये त्यांनी परस्पर संमतीने वाद मिटवला आहे.