इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की, ‘महिलेला तिचे वय आणि पुरुषाला त्याचा पगार विचारु नये.’ सहसा या गोष्टींची माहिती त्यांच्या कुटुंबियांना असते. किंवा नसली तर सदस्य ती देतात. मात्र, वैवाहिक नात्यात वाद सुरू असताना त्याला वेगळे महत्त्व प्राप्त होते. जेव्हा घटस्फोट दोघांच्या संमतीने होत नाही तेव्हा पत्नीला पतीचे उत्पन्न जाणून घ्यायचे असते. त्यावरुनच ती भरणपोषणाची मागणी करते. अशा परिस्थितीत पतीने आपले उत्पन्न जाहीर करण्यास नकार दिल्यास पत्नीकडे ते शोधण्याचे इतर मार्ग आहेत. अशासंदर्भातील एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे.
एका महिलेने माहितीच्या अधिकाराद्वारे (आरटीआय) आपल्या पतीच्या उत्पन्नाची माहिती मागितली आहे. या प्रकरणी केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) प्राप्तिकर विभागाला आदेश दिले आहेत की, महिलेला तिच्या पतीच्या उत्पन्नाची माहिती १५ दिवसांत द्यावी.
पतीचे उत्पन्न जाणून घेण्यासाठी संजू गुप्ता नावाच्या महिलेने माहितीच्या अधिकारात अर्ज केला. बरेलीच्या आयकर विभागाच्या केंद्रीय जन माहिती अधिकारी (CPIO) यांनी ही माहिती देण्यास नकार दिला. कारण पतीने यासाठी संमती दिली नव्हती. त्यानंतर महिलेने प्रथम अपील प्राधिकरणाकडे (एफएए) अपील दाखल केले. एफएएने CPIO चा आदेश कायम ठेवला. त्यानंतर गुप्ता यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे अपील दाखल केले.
केंद्रीय माहिती आयोगाने याबाबत आदेश जारी केला आहे. यासाठी आयोगाने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या निर्णयांचा हवाला दिला आहे. आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, महिलेला तिच्या पतीचे उत्पन्न जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे CIPO ने १५ दिवसांच्या आत पतीच्या उत्पन्नाची माहिती द्यावी.
Husband Salary Wife Information Taken This Step