पाटणा (बिहार) – पती-पत्नीचे नाते अत्यंत पवित्र मानले जाते. विशेषतः भारतीय संस्कृतीत याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. परंतु काही वेळा नालायक लोक दुष्कृत्य करून या नात्याला काळीमा फासत असतात. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नादी पोलिस ठाण्यांतर्गत सबलपूर येथे ही घटना घडली आहे. आपल्या पतीच्या वाईट कर्मामुळे वैतागलेल्या पत्नीने अखेर पोलिस ठाणे गाठले आणि आपली हृदयद्रावक कहाणी सांगितली. यानंतर पोलिस अधिकाऱ्याने त्वरित कारवाई करत आरोपी पतीला अटक केली. आता पोलिस कसून तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबलपूर येथे एक १५ वर्षीय मुलगी तिच्या बहिणीच्या घरी गेली होती. त्यावेळी संधी साधून बहिणीच्या दिराने (नाव – रंज्योति कुमार) त्या किशोरवयीन मुलीशी शारिरिक संबंध ठेवले आणि तिचा फोटोही काढले. तेव्हापासून तो तिच्यावर अत्याचार करीत होता आणि तिला ब्लॅक मेल करत राहिला. त्यानंतर पीडित मुलीचे लग्न दुसर्या ठिकाणी ठरवले असता आरोपीने तिचा अश्लील फोटो तिच्या भावी सासरकडच्यांना पाठविला. यामुळे त्या मुलीचे लग्न मोडले.
सामाजिक दबाव आणि गरिबीमुळे त्या मुलीने ग्रामस्थ, जातपंचायत व कुटुंबातील सदस्यांच्या सहमतीने आरोपीशी लग्न केले. मात्र लग्नानंतर काही दिवसांनी हुंड्यासाठी पतीने तिला मारहाण केली. या किशोरवयीन मुलीच्या गरीब वडिलांनी तिच्या पतीला काही पैसे दिले. तरीही तो सहमत नव्हता. इतकेच नव्हे तर आरोपीने तिचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि तिला मारहाण करत मित्रांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. अखेर तिचा संयम संपला. पतीच्या या दुष्कृत्याने वैतागलेल्या पत्नीने आपल्या कुटुंबातील सदस्यांसह नादी पोलिस ठाणे गाठले आणि पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीवर विविध कलम लावण्यात आले असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.