मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील शेकडो एसटी कर्मचाऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करावे, या आग्रही मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यासंजर्भात कर्मचारी संघटनांशी वारंवार चर्चा करण्यात आली. भरघोस पगारवाढही देण्यात आली. मात्र, संपावर कायम राहण्याचा निर्णय शेकडो कर्मचाऱ्यांनी घेतला. तर, काही कर्मचारी कामावर परतले आहेत. मात्र, जे कर्मचारी संपावर आहेत त्यांचे पुन्हा एसटीच्या सेवेत येण्याचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत.
एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना परत येण्याचे वारंवार आवाहन केले. तसेच, यासंदर्भात महामंडळाने कर्मचाऱ्यांना नोटिसही बजावले. १० हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे निलंबनही केले. महामंडळाने दिलेल्या नोटिशीला संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. महामंडळाने तीनवेळा नोटिस बजावली. या तिन्ही नोटिशींची दखल न घेणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर आता बेरोजगारीची टांगती तलवार आहे. कारण, या कर्मचाऱ्यांना परत सेवेत घेण्याचे मार्ग जवळपास बंद झाले आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आगारामध्ये जाऊन पुन्हा रुजू होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आगार प्रमुखांनी त्यांना काहीच प्रतिसाद दिलेला नसल्याचे समजते. तिन्ही नोटिशींना बेदखल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत महामंडळाचे कुठलेही आदेश नसल्याने आगार प्रमुखांनी या कर्मचाऱ्यांना फारसा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आता या शेकडो कर्मचाऱ्यांचे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.