नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील अनेक भागांमध्ये दारूविक्रेत्यांनी विविध ब्रँडवर मोठी ऑफर दिली आहे. जगांगिरपुरी, शाहदरा आणि मयूर विहारसह शहरातील काही भागांमध्ये दारूच्या दुकानांत काही आयएमएफएल (Indian made Foreign Liquor) ब्रँडवर ३५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली आहे. काही दुकानदारांनी तर एक खरेदी करा आणि एक मोफत मिळवा, अशी सवलत दिल्याने दारूच्या दुकानांवर मद्यप्रेमींच्या रांगा दिसून आल्या.
पूर्व दिल्लीमध्ये दारूच्या दुकानातील एका कर्मचाऱ्याने सांगितले, नव्या आर्थिक वर्षामध्ये परवान्याचे नूतनीकरण केले जात असल्याने दारूच्या दुकानांमधील साठा मार्चअखेरपर्यंत संपवावा लागणार आहे. दुकानांमधील काही ब्रँडची विक्री झालेली नाही. अशा ब्रँडवर दुकानदारांनी एक बाटली खरेदी करा आणि एक मोफत मिळवा, अशी ऑफर दिली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की लग्नसराईचा हंगाम, विकेंड, सोशल डिस्टन्सिंगचे निकष पालन करण्यासाठी दारूच्या दुकानांबाहेर मोठ्या रांगा दिसल्या आहेत. दारू व्यवसायाच्या एका जाणकाराच्या माहितीनुसार, दारूच्या किमती घटवल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरील शहरांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. परिणामी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दिल्ली सरकारच्या नव्या उत्पादन शुल्क धोरण गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लागू करण्यात आले होते.
दिल्लीतील किरकोळ विक्रेते ३० ते ४० टक्क्यांची सवलतच देत आहेतच, शिवाय काही अशा ऑफर देत आहेत, ज्यांना पूर्वी परवानगी नव्हती. उत्पादन शुल्क विभागाने नव्या धोरणांतर्गत कमाल किरकोळ मूल्य निश्चित करण्यात आले आहे. दिल्ली शहराला ३२ विभागांमध्ये विभागण्यात आले आहे. लिलावाच्या माध्यमातून विभागनिहाय परवाने वितरित करण्यात आले आहेत. सरकारकडून एकूण ८४९ नवी दारूची दुकाने सुरू करण्यात येणार आहे. ६०० च्या आसपास दुकाने आतापर्यंत सुरू झाली आहेत. आणखी ५० दुकाने लवकरच खुली होणार आहेत.