पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२४ इयत्ता १ ली ते ५ वी व इयत्ता ६ वी ते ८ वीचा अंतरिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.
दोन्ही परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक ३१ जानेवारी २०२५ पासून संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत उमेदवारांच्या लॉगीन मधून ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल, अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन ६ फेब्रुवारी पर्यंत mahatet24.msce@gmail.com या इमेल वर पाठवावे, त्यानंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.