विशेष प्रतिनिधी, पुणे
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे चिंतामुक्त झालेल्या पालक आणि विद्यार्थ्यांच्या नजरा आता गुणांवर केंद्रित झाल्या आहेत. सीबीएसईकडून मूल्यांकन प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न सुरू असताना कमी गुण मिळू नये याची चिंता पालकांसह विद्यार्थ्यांना सतावत आहे.
जैईई आणि नीट या परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांचे पालक सर्वाधिक हैराण झाले आहेत. शाळेच्या परीक्षेपेक्षा पालकांनी तांत्रिक परीक्षांना अधिक प्राधान्य दिले. सीबीएसईकडून ११ वी १२ वीच्या कामगिरीच्या आधारावर गुण दिले जाणार असल्याने पाल्यांना न्याय मिळणार नाही, असे या पालकांचे म्हणणे आहे.
एक पालक सुधांशू शेखर सांगतात, त्यांचा मुलगा अभियांत्रिकीची तयारी करत आहे. त्यासाठी त्याने एका प्रसिद्ध कोचिंग ग्कासमध्येसुद्धा प्रवेश घेतला आहे. जेईई मेन्स आणि अॅडव्हान्सच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी टिप्स देणार्या कोचिंग क्लासला त्याने दोन्ही वर्ष प्राधान्य दिले. प्रवेश मिळविण्यासाठी जितके गुण आवश्यक आहेत, तेवढेच लक्ष शाळेच्या अभ्यासात त्याने दिले आहे. या प्रयत्नात त्याची शालेय कामगिरी खूपच चांगली आहे असे नाही. जर ११ वी आणि १२ वीच्या कामगिरीच्या आधारावर गुण मिळणार असतील, तर त्याच्या योग्यतेलायक त्याला गुण मिळणार नाहीत.
मूल्यांकनावर चिंता व्यक्त करताना आणखी एक पालक प्रवीण वर्मा सांगतात, सीबीएससीच्या सर्व विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन मूल्यांकने केले जावे. जेणेकरून प्रवेश परीक्षा आणि मेरिटच्या आधारावर प्रवेश मिळणार्या विद्यार्थ्यांचे प्रवेशप्रक्रियेदरम्यान कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.
विद्यार्थ्यांचे वर्षाचे नुकसान होणार नाही अशी चिंता पालकांना आहे. निकाल जाहीर करण्यास जितका वेळ लावला जाईल त्याचा थेट परिणाम महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रियेवर होणार आहे. त्यामुळे मुलांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.