इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – येत्या काही वर्षांत भारताला सुमारे एक लाख ड्रोन वैमानिकांची गरज भासेल, असे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रालये देशभरात ड्रोन सेवेच्या स्वदेशी मागणीला चालना देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत येत्या काही वर्षांत सुमारे एक लाख ड्रोन वैमानिकांची गरज आहे. त्यामुळे तरुणांना रोजगाराच्या प्रचंड संधी आहेत, असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री सिंधिया पुढे म्हणाले, बारावी उत्तीर्ण असलेले ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण घेऊ शकतात. यासाठी महाविद्यालयीन पदवी आवश्यक नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही वर्षांत सुमारे एक लाख ड्रोन वैमानिकांची गरज भासणार आहे. दोन-तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. एखादी व्यक्ती सुमारे ३० हजार रुपये मासिक पगारासह ड्रोन पायलटची नोकरी घेऊ शकते.
दिल्लीत ड्रोनवरील नीति आयोगाचा अनुभव स्टुडिओ लॉन्च करताना, सिंधिया म्हणाले, “२०३० पर्यंत भारताला जागतिक ड्रोन हब बनवण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही विविध औद्योगिक आणि संरक्षण संबंधित क्षेत्रात ड्रोनच्या वापरास प्रोत्साहन देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात नवीन व विकसित तंत्रज्ञान हवे आहे. अधिकाधिक लोकांना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
ड्रोन सेवा सुलभतेने उपलब्ध करण्यासाठी वेगाने काम सुरु करण्यात आले आहे. भारतात लवकरच ड्रोन नवकल्पना स्वीकारणारे उद्योगधंदे दिसतील. ” तीन पद्धतीने हे धोरण लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही ड्रोन क्षेत्राला वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्षात आणण्याची अंमलबजावणी आणि तिसऱ्या टप्प्यात मागणी निर्माण करण्याचे लक्ष आहे. १२ केंद्रीय मंत्रालयांकडून मागणीविषयक प्रक्रिया सुरु आहे. ही योजना ड्रोन क्षेत्रातील उत्पादन आणि सेवांना नवीन चालना देईल,” मंत्री म्हणाले.