नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इयत्ता १२ वी विज्ञान मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव महाविद्यालयाच्या माध्यमातून स्वीकारण्यात येणार आहेत. मंडणगड पॅटर्ननुसार संबंधित महाविद्यालयामार्फत अर्जांची स्विकृती करण्याचा निर्णय नाशिक समितीने घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.समाज कल्याण, विभागाच्या आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकाराने व श्री धम्म ज्योती गजभिये. महासंचालक, बार्टी पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार दि.01.12.2022 ते दि.31/12/2022 या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंडणगड पॅटर्न नुसार नाशिक जिल्हयातील इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तसेच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात प्रथम, व्दित्तीय व तृत्तीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या मागास प्रवर्गातील सर्व विदयार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक यांचे वतीने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विदयार्थांना इयत्ता 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रीकी, वैदयकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फॅार्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमास आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी तसेच सदर अभ्यासक्रमाची शिक्षण फीची प्रतीपूर्ती करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. तथापी इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील विदयार्थी वेळेत त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव समितीकडे दाखल करीत नाहीत, पर्यायाने अशा विदयार्थ्यांना वरील सवलतीचा लाभ मिळत नाही. सदर अडचण विचारात घेऊन तसेच विद्यार्थ्यांचा त्रास कमी होण्याच्या दृष्टिने शैक्षणिक वर्ष सन 2022-2023 मध्ये इयत्ता 12 विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या अनुसुचित जाती,विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील सर्व विदयार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येत आहे.
त्याकरीता संबंधित मागासवर्गीय विदयार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरुन सदर अर्जाची हार्ड कॉपी संबंधीत महाविदयालयात दाखल करावी व संबंधीत महाविदयालयांनी असे अर्ज दिनांक 01.12.2022 ते 31.12.2022 या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक यांचेकडे सादर करावेत. नाशिक जिल्हयातील काही महाविदयालयामध्ये समिती मार्फत शिबीरे आयोजित करण्यात आलेले असून त्याच ठिकाणी संबंधीत विदयार्थ्यांचे अर्ज महाविद्यांमार्फत स्विकारण्यात येणार आहेत, त्यांना तपासणी करुन ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येतील, असे समाज कल्याण विभागाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
HSC Student Cast Validity Certificate Decision