विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकारने इयत्ता १२वीची परीक्षा रद्द केली असली तरी निकाल कसा लागणार हे जाहिर केले आहे. सरकारने आज निकालाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. केंद्रीय शिक्षण माध्यमिक बोर्ड (सीबीएसई)ने इयत्ता १२वीच्या परीक्षा रद्द करुन निकालाबाबत स्पष्टता यापूर्वीच केली आहे. सीबीएसईने निकालाचा जो फॉर्म्युला जाहिर केला आहे त्यानुसार, इयत्ता १० वीतील ३० टक्के गुण, ११वीतील ३० टक्के गुण आणि इयत्ता १२वी तील ४० टक्के गुण अशा प्रकारे ३०ः ३०ः ४० अशा तत्वानुसार निकाल लावला जाणार आहे.
इयत्ता १२वीच्या घटक परिक्षा, सत्र परिक्षा आणि प्रात्यक्षिक परिक्षा यांचे गुण यासाठी ग्राह्य असणार आहेत. इयत्ता १२वीतील ५ विषयांपैकी ३ विषयातील जे चांगले गुण आहेत ते सुद्धा या निकालात समाविष्ट असतील. सीबीएसई १२वीचा निकाल ३१ जुलै रोजी घोषित केला जाणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवरच राज्य बोर्ड इयत्ता १२वीचा निकाल घोषित होणार आहे. म्हणजेच, सीबीएसई बोर्डाचे निकालाचे सूत्रच राज्यातही राबविले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.