नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विभागातील ब-याचशा कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे पार्सल स्वीकारण्यास आणि तपासण्यास नकार दिल्याचा प्रकार निदर्शनास आल्याने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळाने अशा कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापनाला संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाची मंडळ मान्यता आणि सांकेतांक रद्द करण्याच्या कारवाईची तंबी देण्यात आली आहे.
बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचे काही पेपर्स पार पडले असून काही पेपर्स अद्याप होणे बाकी आहेत. झालेल्या पेपर्सच्या उत्तर पत्रिकांचे पार्सल बोर्डाकडून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांतील परीक्षक आणि नियामकांकडे पाठविण्यात आलेले आहेत. मात्र विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील ब-याचशा कनिष्ठ महाविद्यालयांतील परीक्षक म्हणून बोर्डाने नेमलेल्या शिक्षकांकडून उत्तरपत्रिकांचे पार्सल तपासण्यासाठी ताब्यात घेण्यास नकार दिला गेल्याचे प्रकार बोर्ड प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही परिस्थितीत १० जूनपूर्वी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करणे बोर्डासाठी बंधनकारक आहे. परंतु ब-याचशा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बोर्डाच्या बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकल्याने बोर्ड प्रशासनाकडून थेट संबधित कनिष्ठ महाविद्यालय चालविल्या जाणा-या शिक्षण संस्था व्यवस्थापनालाच कारवाईची तंबी दिली आहे. कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाला परवानगी देतेवेळी बोर्डाकडून मान्यता आणि संकेतांक प्रदान केलेला असतो.
अशा प्रकारची मान्यता देतांना कनिष्ठ महाविद्यालयाच्या भौतिक सुविधा आणि सेवा बोर्डाच्या परीक्षाशी संबंधित कामांसाठी उपलब्ध करून देणे कनिष्ठ महाविद्यालयांना बंधनकारक असल्याच्या नियमाची आठवण बोर्डाने सर्व कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापनाला करुन देण्यात आली आहे. ज्या शिक्षकांनी बोर्डाच्या बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यास नकार दिला आहे अशा सर्व शिक्षकांना आपल्या स्तरावरून उत्तरपत्रिका तपासणे, नियमन करणे बंधनकारक करावे आणि तपासलेल्या, नियमन केलेल्या उत्तरपत्रिका बोर्ड कार्यालयात वेळेत जमा करण्याबाबत लेखी आदेश देण्यात यावेत, असे सक्त निर्देश नाशिक विभागीय परीक्षा मंडळ सचिव डॉ. राजेंद्र अहिरे यांनी विभागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापनाचे अध्यक्ष, सचिव आणि प्राचार्यांना दिले आहेत. निकाल वेळेत लावण्याच्या कामात व्यत्यय आल्यास शिक्षकांसह प्राचार्यांना देखील जबाबदार धरले जाईल असेही बोर्डाने कळविले आहे.
उत्तरपत्रिका तपासणी आणि परीक्षण, नियमन केलेल्या उत्तरपत्रिका बोर्ड कार्यालयात जमा करण्याचे काम जे कनिष्ठ महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य संबंधित शिक्षकांकडून करवून घेणार नाहीत अशा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात येणार आहेत. निकाल राखीव ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणा-या शैक्षणिक नुकसानीस कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन, प्राचार्य यांना जबाबदार धरण्यात येईल. त्यांनतर अशा कनिष्ठ महाविद्यालयाची मंडळ मान्यता व सांकेतांक रद्द करण्याबाबत मंडळामार्फत रितसर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल अशी तंबीच बोर्डाच्या सचिवांनी दिली आहे.