नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनच्या वतीने विहीतगाव येथील श्री दत्त पेट्रोलियमच्या माध्यमातून ‘इंधन बचाओ, देश बचाओ’ या उपक्रमांतर्गत नासाका विद्यालयात कार्पोरेशनचे जनरल मॅनेजर शशांक दाभाणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत नासाका माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यात वैष्णवी भागवत, अर्पिता सोनवणे आणि सार्थक सानप यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह कार्पोरेशनचे अधिकारी भौमिक कौशीक, अविरल सिंग, श्री दत्त पेट्रोलियमचे बापू वावरे, सचिन हांडोरे, अनिकेत वावरे, प्रल्हाद गायधनी, मुख्याध्यापक सुनील बर्वे, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. बापू वावरे यांनी इंधन बचतीसाठी मौलिक मार्गदर्शन केले. शिक्षक विजय पाटील आणि कैलास लहांगे यांनी परीक्षण केले. रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले.