विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रकोप कमी होत असताना आता पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. तिसर्या लाटेचा धोका ओळखून लहान मुलांचे कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
सलग चार ते पाच दिवस ताप, जेवण कमी जाणे, थकवा जाणवणे अशी लक्षणे लहान मुलांमध्ये आढळल्यास पालकांनी सतर्क होण्याची गरज आहे. ऑक्सिजनचा स्तर ९५ पेक्षा कमी झाला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शक्यतो मुलांना ज्येष्ठ नागरिकांपासून दूर ठेवावे. लक्षणे नसलेल्या मुलांचा ज्येष्ठांना धोका संभवतो, असे सूचित करण्यात आले आहे.
मुलांसाठी पाच नियम
– लहान मुलांना कोमट पाणी द्यावे.
– दोन वर्षांहून अधिक वयाच्या मुलांनी सकाळी आणि रात्री ब्रश करावा.
– पाच वर्षांहून अधिक वयाच्या मुलांनी कोमट पाण्याने गुळण्या कराव्या.
– तेलाने मालिश करावी, नाकात तेल टाकावे, योगा आणि मेडिटेशन आवश्यक
– पाच वर्षांहून अधिक वयाच्या मुलांच्या क्षमतेनुसार योग करू शकता.
पौष्टिक अन्न आणि औषधे
मुलांमधील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दुधामध्ये हळद टाकून द्यावी, च्यवनप्राशन, आयुष बाल क्वाथ द्यावे. कोरोनाबाधित मुलांना लक्षणांच्या आधारावर वेगवेगळे आयुर्वेदिक औषधे दिली जाऊ शकतात. कोणतेही आयुर्वेदिक औषध डॉक्टरांच्या सल्ला घेतल्याशिवाय देऊ नये. हिरव्या पालेभाज्या, फळे खायला द्यावीत. बाहेर गेल्यास आरोग्यासाठी अपायकारक आहे, हे मुलांना समजून सांगावे.
आजारी मुलांबाबत सतर्क राहावे
गंभीर आजार जसे स्थूलपणा, टाइप-१ मधुमेह, हृदय, फुफ्फुस किंवा रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या मुलांना महामारीच्या तिसर्या लाटेत सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे पालकांनी मुलांबाबत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. कर्करोगासह इतर आजारांनी ग्रस्त मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते औषधोपचार करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
विषाणूपासून वाचवणे आव्हान
आयुष मंत्रालयानुसार, ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत लहान मुलांना विषाणूपासून वाचविणे आव्हानात्मक आहे. कारण की प्रत्येक मुलांची शारिरीक, मानसिक आणि रोगप्रतिकारक शक्तीची क्षमता वेगळी असते. अशा सर्व मुलांची काळजी घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हात धुण्याची सवय लावाच
कोरोनाच्या तिसर्या लाटेपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी नियमित हात धुण्याची सवय लावून घ्यावी. जर मुले हात धुवूत नसतील तर त्यांना आवडती वस्तू देण्याचे आश्वासन द्यावे. जेणेकरून त्याला हात धुवायची सवय लागेल.