मुंबई – इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) मध्ये आता तुम्ही डिजिटल सेवेच्या माध्यमातून खाते उघडू शकता. आयपीपीबीनं मोबाईल अॅपच्या माध्यमातून डिजिटल रुपात बचत खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट ऑफिस खातेधारक आयपीपीबी मोबाईल अॅपद्वारे बँकेचे प्राथमिक स्वरूपाचे व्यवहार सोप्या पद्धतीने करू शकतात.
ग्राहकांना खात्यामधील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी, पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आणि इतर व्यवहार करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागायचे. आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना बँकिंग सेवा सहजरित्या पोहोचली आहे.
जर तुम्हाला आयपीपीबीचे खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल आणि बँकेतील रांगेत उभे रहायचं नसेल तर घरी बसल्या बसल्या आयपीपीबी अॅप डाउनलोड करून डिजिटल बचत खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी ग्राहकाचं वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे आणि तो भारतीय नागरिक असला पाहिजे.
डिजिटल बचत खाते फक्त एका वर्षासाठी वैध असते. खाते उघडण्यासाठी एका वर्षाच्या आत तुम्हाला बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करणे गरजेचं आहे. त्यानंतरच बचत खात्यात बदल केला जाईल. खाते उघडण्यासाठीची प्रक्रिया जाणून घेऊ या.
१) आपल्या मोबाईलमध्ये आयपीपीबी मोबाईल बँकिंग अॅप डाउनलोड करा. त्यानंतर आयपीपीबी मोबाईल बँकिंग अॅपला ओपन करून Open Account वर क्लिक करा.
२) इथं तुम्हाला पॅनकार्ड आणि आधारकार्ड नंबर नोंदवायचा आहे.
३) त्यानंतर तुम्हाला लिंक्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी नंबर येईल. तो तिथे नोंदवा.
४) त्यात तुम्हाला आईचे नाव, शैक्षणिक माहिती, पत्ता आणि तुमच्या नॉमिनीची माहिती भरायची आहे.
५) माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. या प्रकारे तुमचे खातं उघडेल.
६) तुम्हा या इन्स्टंट बँक खात्याचा उपयोग अॅपद्वारे करू शकता.