अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आजच्या डिजीटल युगात आपल्या घर किंवा कार्यालयाचा पत्ताही डिजीटल असणे गरजेचे आहे. कारण, आपल्या घरी येणारे हे अनेकदा गुगल मॅपचा सहारा घेऊनच येत असतात. तुम्हालाही तुमचा डिजीटल पत्ता बनवता येणार आहे. त्यासाठी गुगलने तुम्हाला एक चांगली सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही सुविधा काय आहे आणि डिजीटल पत्ता कसा बनवायचा हे आपण आता जाणून घेऊया..
गुगल इंडियाने प्लस कोड हे नवे फिचर लॉन्च केले आहे. ज्याद्वारे गुगल मॅपवर आता आपण आपला डिजिटल पत्ता तयार करू शकणार आहोत. या फिचरद्वारे आपले घर शोधणे सोपे होणार आहे. या डिजिटल पत्त्यावर लोकांची नावे, परिसर आणि घर क्रमांक याची आवश्यक नसणार आहे.
डिजिटल पत्ता कोड प्लस कोड हे अक्षांश आणि रेखांशावर आधारित असतात आणि सरळ आपल्या दारापर्यंतचा अचूक पत्ता यातून मिळू शकतो. हे फिचर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणार असल्याचे गुगल इंडियाने सांगितले आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार, या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या घराचा डिजिटल पत्ता तयार करू शकतील. ज्याद्वारे कोणतीही व्यक्ती तुमच्या अचूक ठिकाणापर्यंत पोहोचू शकेल.
हे सध्याच्या पिन कोडप्रमाणे काम करेल. म्हणजे तुमच्या पत्त्यावर डिजिटल कोड नंबर दिला जाईल. हे आपण मॅन्युअली टाकलेल्या पत्त्यापेक्षा पूर्णपणे भिन्न पद्धतीने काम करणारे असेल. याद्वारे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून आपल्या पत्त्यावर पोहोचता येणे शक्य होणार आहे. या डिजिटल पत्त्यावर लोकांची नावे, परिसर आणि घर क्रमांक देण्याची आवश्यकता नसेल. डिजिटल पत्त्याचा कोड, प्लस कोड हे अक्षांश आणि रेखांशावर आधारित असतात. संख्या आणि अक्षरांच्या रुपात आपल्याला ते एपवर दिसू शकतील. जिथे जायचे आहे त्या ठिकाणच्या दरवाजापर्यंत अचूक लोकेशन आपल्याला याद्वारे मिळणार आहे.
डिजिटल पत्त्यासाठी कोड तयार करण्यासाठी देशातील प्रत्येक घराची स्वतंत्र ओळख केली जाईल आणि पत्ता भू-स्थानिक निर्देशांकांशी जोडला जाईल, जेणेकरून प्रत्येकाचा पत्ता नेहमी रस्त्यावर किंवा शेजारून नव्हे तर संख्या आणि अक्षरे असलेल्या कोडद्वारे ओळखला जाऊ शकतो. हा कोड आपल्या पत्त्यासाठी कायमस्वरूपी कोड म्हणून ओळखला जाईल. डिजिटल पत्त्यासाठी तुम्हाला तुमचा फोन नंबर किंवा भौतिक पत्ता कोणाशीही शेअर करावा लागणार नाही. यामुळे ई-कॉमर्स, लॉजिस्टिक आणि डिलिव्हरी कंपन्यांना माल पोहोचवणेही सोपे होणार आहे. डिजिटल कोडसह प्लस कोडमुळे अन्न, औषध किंवा पार्सल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणेही सोपे जाणार आहे. त्यामुळे आपल्या वैयक्तिक माहितीही वैयक्तिक ठेवण्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरणार आहे.