चेहऱ्यावरून स्वभाव ओळखायचा आहे?
सार्वजनिक जीवनात वावरतांना आपल्याला अनेक व्यक्तींशी बोलावे लागते. अनेक प्रकारच्या व्यक्तींशी व्यवहार करावे लागतात. चर्चा करावी लागते. काही व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करावे लागतात. आपल्या विविध उपक्रमात नवनवीन व्यक्तींना सामील करून घ्यावे लागते. अशावेळी संबंधित व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, ही व्यक्ती आपल्याला उपयोगी ठरेल का, आपल्या स्वभावाशी या व्यक्तीचे जुळेल का, याचा काहीच अंदाज आपणास येत नाही. म्हणून बरेचदा सार्वजनिक जीवनामध्ये अनेक ठिकाणी भेटणाऱ्या नवीन व्यक्तींचा स्वभाव ओळखता न आल्याने विविध बाबतीत आपले अंदाज चुकतात. प्रसंगी कटू अनुभव येतात. चेहऱ्यावरून पण स्वभावाचा अंदाज करता येतो. त्यासाठी काही सर्वसामान्य टिप्स आपण लक्षात ठेवूया….
चेहऱ्याचे मुख्यतः COSMIC, GLOBAL, ELLURIC असे तीन भाग पडतात.
१) कॉस्मिक एरिया
कपाळाचा संपूर्ण भाग म्हणजे कपाळावरील केसांची बॉटम हेअर लाईन पासून भुवई पर्यंतचा भाग. यास चेहऱ्याचा कॉस्मिक एरिया COSMIC AREA म्हणतात. कॉस्मिक एरिया जेवढा भव्यदिव्य रुंद असतो अशा व्यक्ती त्या ज्या क्षेत्रात आहेत या क्षेत्राशी संबंधित अतिशय प्रगल्भ ज्ञान त्यांना असते.
अशा व्यक्ती बोलताना अतिशय सखोल शब्दरचना वापरतात. अशा व्यक्ती बोलताना सर्वांनी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकावे, असा त्यांचा आग्रह असतो. मुद्देसूद विषय मांडणे, विषयाचा व्यासंग मांडण्यात अशा व्यक्ती अतिशय हुशार असतात. अनेक प्रसंगी समोरच्या व्यक्तीस असे लोक निरुत्तर करतात.
समोरच्या व्यक्तीने देखील आपला मुद्दा मांडताना अभ्यासू पद्धतीने बोलावे, अशी यांची अपेक्षा असते. अशा व्यक्ती सभा, संमेलनात, बोलण्यात कायम अग्रेसर असतात. कोणतेही प्रोजेक्टचे नेतृत्व करतात. एकाचवेळी अनेक व्यक्तींना सांभाळून घेतात. बोलताना प्रत्येक शब्द त्याच्या गर्भितार्थासह बोलतात.
२) ग्लोबल एरिया
चेहऱ्याचा दुसरा भाग म्हणजे ग्लोबल एरिया GLOBAL AREA. भुवई पासूनवरच्या ओठापर्यंतच्या भागाला ग्लोबल म्हणतात. व्यक्तीचा व्यवहारिकपणा, भावनिकपणा, नातेसंबंध टिकवण्याची वृत्ती, आपुलकी, माणुसकी, कौटुंबिक जिव्हाळा, शेवटपर्यंत साथ निभावण्याची वृत्ती, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, त्याचप्रमाणे खवय्या वृत्ती हे या भागाच्या लांबरुंदपणा वरून लक्षात येतात.
३) तेल्लुरिक एरिया
तिसरा भाग म्हणजे तेल्लुरिक एरिया TELLURIC AREA. खालच्या ओठा पासून हनुवटीच्या शेवटपर्यंतचा एरिया. हा भाग जेवढा लांब, रुंद हनुवटी जेवढी बाकदार तेवढे अशा व्यक्तीचे भविष्यकालीन अंदाज एकदम अचूक असतात. संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे अंतरंग ओळखण्यात अशा व्यक्ती पटाईत असतात. अशा व्यक्तींचे लॉजिक अतिशय अचूक असते.
कितीही मोठ्या संकटातून अशा व्यक्ती बुद्धिचातुर्याने मार्ग काढतात. प्रतिस्पर्ध्याला सर्व आघाड्यांवर नामोहरम करण्याची कुशाग्र बुद्धी अशा लोकांमध्ये असते. मोठ्या उपक्रमांचे प्लॅनिंग करून उपक्रम तडीस नेणे यात त्यांचा हातखंडा असतो. असे लोक अतिशय दिलदार वृत्तीचे असतात. संकटकाळी केव्हाही मदतीस तत्पर असतात.
……
चेहऱ्यावरून स्वभाव ओळखण्याच्या सर्वसामान्य अंदाजामध्ये व्यक्तीचे डोळे, भुवया, कान, नाक, मान, चेहऱ्यावरील तीळ यावरून देखील स्वभावाचा अंदाज करता येतो.