खऱ्या हापूसची ओळख
सध्या आंब्याचा सिझन सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या नजरा आंब्याकडे वळतात आणि ते खरेदी करतात. मात्र, अनेकदा फसगत होते. घेताना हापूस असे सांगितले होते प्रत्यक्षात तो हापूस नसल्याची अनेकांची तक्रार असते. खऱ्या हापूस आंब्याची खरेदी, दर्जा, कोकणातील ओरिजनल हापूस कसा ओळखावा, आंबा कसा टिकवावा या व अशा अनेक शंकांचे निरसन करणारा हा लेख….
१) कोकणातील हापूस आंबा कसा ओळखावा?
हापूस आंब्याच्या बाह्य रुपावरुन तसा हापूस ओळखणे अवघड आहे. कारण हापुस आंब्याचे झाड कुठेही लावले तरी हापुसच येणार. पण कोकणातील हापूस आंब्याला असणारी चव ही खारे हवामान , जांभा दगड व तांबडी माती यामुळे येते. तरी कोकणातील हापुस आंब्याची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. कोकणातील हापूसचा वास , कोय लहान , दशा अजिबात नसतात , अतिशय पातळ साल , पुर्ण रस निघतो कोयीला काहीच गर रहात नाही , देठापासुन उजवा भाग उंच असतो.
*२) नैसर्गिकरीत्या आंबा पिकवणे म्हणजे काय?*
कोकणातील शेतकरी आंबा काढल्यानंतर गवताचे लाकडी पेटीत अथवा गवताची अढि लावून आंबा पिकवतात यास ८/१० दिवस लागतात. मात्र हाच आंबा व्यापार्याच्या हातात पडला तर त्यांना ऐवढा वेळ नसतो म्हणून ते कॅल्शियम कार्बाईड (जे गॅस वेल्डींगसाठी वापरतात) वापरतात. कॅल्शियम कार्बाईडमधे प्रचंड उष्णता असल्याने हा आंबा २४ ते ३६ तासात पुर्ण पिवळा होतो. मात्र तो आंबटच असतो. शिवाय कॅल्शियम कार्बाईड हे विषारी असून त्याच्या वापरावर बंदी आहे. पण व्यापारी हे बिनदिक्कत करतात. अगदि शासनाचा अंकुश असलेल्या बाजार समितीत सुद्धा हे काम चालते. सोबतच्या चित्रातील बातमी बघावी. यंदा वाशी व पुणे मार्केट यार्डात असे छापे पडले आहेत. पण असा कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा विषारी बनतो. याचे या मंडळींना काहीही वाटत नाही.









