विशेष प्रतिनिधी, पुणे
आजच्या काळात व्हॉटसअॅप हे अतिशय शक्तीशाली आणि वेगवान सोशल माध्यम आहे. खासकरुन भारतात तर ते अतिशय लोकप्रिय आणि वापरले जाणारे अॅप आहे. आणि याच अॅपच्या माध्यमातून अफवा आणि खोट्या बातम्याही पसरविल्या जातात. सध्या कोरोनाच्या काळात आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या आणि बनावट बातम्या तसेच अफवांचे पेव फुटत आहे. विशेषतः व्हॉट्सअॅप सारख्या समाज माध्यमातून असे सतत घडत आहे.
भारतात काही लोक विचार न करता कुठूनही आलेला व्हॉट्सअॅपवर मेसेज खात्री न करता फॉरवर्ड करतात. यामुळेच मॉब लिंचिंगसारख्या घटना घडतात. तसेच, अनेकदा धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या बाबीही घडतात. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर प्राप्त झालेल्या संदेश किंवा लिंकची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी होते. खोटे आणि बनावट बातम्या कशा ओळखाव्यात यासंबंधी आपण आज ५ मुद्दे जाणून घेऊ या…
१) प्रथम संदेश तपासा
व्हॉट्सअॅपवर तुम्हाला फॉरवर्ड मेसेज आला असेल तेव्हा नक्कीच तो तपासून पहावा. गुगलवर मेसेजमध्ये केलेला दावा तपासावा तसेच विश्वासार्ह स्रोताकडून देखील संदेश तपासून घ्यावा. याद्वारे आपल्याला बनावट संदेश ओळखण्यात मदत होऊन तो पुढे पाठविणे टाळता येईल.
२) संदेश पुढे पाठविणे टाळा
काही वेळा आपल्याला असे संदेश मिळतात, ज्यात शब्दलेखनासह माहिती चुकीची असते, असे बनावट संदेश त्वरित हटवा. आणि कोणाकडे पुढे पाठवू नका. असे केल्याने आपण समाजात बनावट बातम्यांचा प्रसार थांबवू शकतो.
३) फोटो नीट तपासा
व्हॉट्सअॅपवर आपल्याला प्राप्त होणारे कोणतेही फोटो आणि व्हिडिओ प्रथम नीट तपासा. बनावट बातम्या पसरविण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ संपादित केले गेले आणि पाठविले गेले आहेत, हे ओळखा.
४) लिंककडे लक्ष द्या
व्हॉट्सअॅप संदेशातील लिंककडे नक्की लक्ष द्या. लिंकध्ये चुकीचे स्पेलिंग असल्यास लिंक बोगस असू शकते. तेव्हा अशा परिस्थितीत चुकीचे स्पेलिंग असलेली लिंक उघडू नका. अन्यथा तुमची वैयक्तिक माहिती लिक होईल.
५) पीआयबी फॅक्ट-चेक
आपल्याला एखाद्या संदेशाबद्दल शंका असल्यास आणि त्याची गुणवत्ता तपासण्यास पीआयबी फॅक्ट-चेकची मदत घेऊ शकता. येथे त्या बनावट संदेशांबद्दल माहिती मिळेल. जे संदेश आताच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले. यासाठी https://factcheck.pib.gov.in/ या लिंकला भेट देऊन आपण बनावट संदेशांबद्दल अधिक व खात्रीची माहिती घेऊ शकता.