ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘सरकारी काम आणि चार महिने थांब!’ असे म्हटले जाते. कारण कोणतेही शासकीय काम असो की ती वेळेवर पूर्ण होईल अशी कुणालाही खात्री वाटत नसते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये शासकीय कामांविषयी नेहमीच गैरसमज असतो. आजही आपल्या देशात प्रत्येक कामासाठी अनेकजण सरकारी कार्यालयांच्या चकरा मारत असतात, अगदी छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत. कोणत्याही सरकारी खात्यात जावे लागते, पण अनेकांचे काम होत नाही, त्यामुळे सर्वसामान्य माणूस शेवटी आशा सोडतो. ही सर्व कामे अनेक टप्प्यात पूर्ण होत असल्याने सरकारी कार्यालयातील कामे पूर्ण होण्यास बराच कालावधी लागत असल्याचे दिसून येते.
या कामांच्या किंवा प्रकरणात अधिक वेळ घेणे अपरिहार्य आहे. परंतु अनेक वेळा कार्यालयातील अधिकारी जाणूनबुजून काही काम पूर्ण करत नाहीत, लाच किंवा अन्य कारणाने अनेक कामे मध्येच लटकवतात. अशा स्थितीत काम होत नाही आणि तुम्ही काम पूर्ण होण्याची आशा सोडून देता. परंतु पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) या संदर्भात एक सुविधा निर्माण करुन दिली आहे
तुम्ही कोणत्याही कार्यालयात अशा निष्काळजीपणाची तक्रार थेट पीएमओ कार्यालयात करू शकता. तसेच, जर तुमच्या कामाकडे लक्ष देत नसेल तर तुम्ही तुमच्या कामाशी संबंधित थेट पीएमओकडे तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला खालील टप्पे पूर्ण करावे लागतील..
तुमची कोणतीही तक्रार PMO कडे पाठवण्यासाठी, तुम्हाला प्रथम पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट https://www.pmindia.gov.in/en वर जावे लागेल. येथे ड्रॉप डाउन मेनूवर जाऊन तुम्ही ‘पंतप्रधानांना लिहा’ हा पर्याय निवडा. यानंतर, तुमची कोणतीही तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाला ऑनलाइन मोडद्वारे पाठवू शकता.
यानंतर तुमच्या समोर एक CPGRAMS पेज उघडेल. त्यात तुमची तक्रार या पेजवर लिहा. त्यानंतर एक नोंदणी क्रमांक येईल.
आता तक्रारीशी संबंधित सर्व कागदपत्रे येथे अपलोड करा. यासह तुमची तक्रार नोंदवली जाईल.
ऑनलाइन पद्धतीव्यतिरिक्त, तुमची तक्रार ऑफलाइन मोडद्वारे पीएमओकडे पाठवू शकता. यासाठी तुम्हाला तुमची तक्रार पोस्टाने पंतप्रधान कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवावी लागेल. पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता – साउथ ब्लॉक, नवी दिल्ली – 110011 असा आहे.