इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हाताच्या बोटावर मोजण्याएवढे चित्रपट सोडले तर विषयाच्या अभावामुळे प्रेक्षक चित्रपटगृहाकडे आकर्षित होत नसल्याचे चित्र आहे. त्यातच मध्यंतरी ‘बॉयकॉट बॉलीवूड’चा ट्रेंड आला. याचाही फटका चित्रपटसृष्टीला बसला. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मात्र, याउलट स्थिती दिसते आहे. ‘कांतारा’च्या रूपाने साऊथच्या चित्रपटाने प्रेक्षकच नव्हे तर सेलिब्रिटींची वाहवा मिळवली आहे.
धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास, विवेक अग्निहोत्री, कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कौतुक केलं. यासोबत चित्रपटतील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. पण, ऋषभ शेट्टीला हा चित्रपट योगायोगाने मिळाला. खरं तर ऋषभ शेट्टीला अगदी योगायोगाने हा चित्रपट मिळाला. दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार या चित्रपटात शिवा ही भूमिका साकारणार होता. खुद्द ऋषभ शेट्टीनं एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे. ‘कांतारा’मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत आहेत.
‘कांतारा’ हा चित्रपट सुपरहिट ठरतो आहे. सध्या सर्वत्र याचीच चर्चा आहे. या चित्रपटातील आपल्या ‘शिवा’ या भूमिकेबाबात एका मुलाखतीमध्ये ऋषभ शेट्टीने आपले विचार व्यक्त केले. ‘शिवा ही भूमिका मला साकारायची होती पण या चित्रपटाची निर्मिती करण्याआधी या भूमिकेची ऑफर अभिनेता पुनीत राजकुमार यांना देण्यात आली होती’, असे ऋषभ शेट्टी सांगतो. पुनीत खूप चांगला अभिनेता होता. या भूमिकेसाठी तो एकदम परफेक्ट होता. त्यांना मी चित्रपटाची कथा सांगितली होती. मात्र, ते एका दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने त्यांना यात काम करणे शक्य नव्हते. एके दिवशी त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले की, हा चित्रपट तुम्ही माझ्याशिवाय करा. माझी वाट पहात राहिलात तर हा चित्रपट काही यंदा होणार नाही. दुर्दैवाने ते खरे ठरले.
पुनीत राजकुमार यांचे निधन होण्यापूर्वी ‘बजरंगी २’ चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये ऋषभ शेट्टी आणि पुनीत यांची भेट झाली होती. तेव्हाही त्यांनी ‘कांतारा’बद्दल विचारल्याचे ऋषभने सांगितले. त्यावर ऋषभने त्यांना शूटचे काही फोटोही दाखवले. काम करायला जमत नसले ते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होते.” अभिनेता पुनीत राजकुमार यांचं २९ ऑक्टोबर रोजी निधन झालं. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला. अवघ्या १६ कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या दक्षिणेतच नव्हे तर, हिंदीमध्येही धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
How Rishabh Shetty Got Role in Kantara Movie