मुंबई – नवे नंबर घेऊन अनेक सिमकार्ड खरेदी करणार्यांना किंवा ठराविक काळानंतर आपला नंबर बदलणार्यांना आगामी काळात अडचणींचा सामना करवा लागू शकतो. कदाचित अशा युजर्सचे सिमकार्ड बंदसुद्धा होऊ शकतात. दूरसंचार विभागाच्या नव्या निर्णयामुळे युजर्सना आता सतर्कतेने पावले टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. जर तुमच्याकडे अतिरिक्त सिमकार्ड असतील तर ते चेक करण्यासाठी काय करावे हे आपण जाणून घेऊया.
दूरसंचार विभागाने आर्थिक फसवणूक, बनावट आणि स्वयंचलित कॉल्स आणि फसवणुकींच्या घटनांची चौकशी करण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. जे सिमकार्ड वापरात नाहीयेत अशांना मोबाइल कनेक्शनला डेटाबेसमधून हटविण्याचे आदेश दूरसंचार विभागाने दिले आहेत.
ग्राहकांनो हे करा
– फ्लॅग्ड म्हणजेच चिन्हांकित केलेल्या मोबाईल कनेक्शनची आउटगोइंग (डेटा सेवेसह) सुविधा ३० दिवसांच्या आत बंद केली जाईल. इनकमिंग सेवाही ४५ दिवसांच्या आत बंद केली जाईल. एखादा ग्राहक पडताळणीसाठी आला आणि त्याने सरेंडर करण्याच्या पर्यायाचा वापर केला तर त्याचे डिसकनेक्ट मोबाईल कनेक्शन स्थलांतरित केले जाईल.
– जर एखादा ग्राहक पडताळणीसाठी आला नाही, तर फ्लॅग केलेल्या नंबरला ६० दिवसांच्या आत डिएक्टिव्हेट केले जाईल. त्याची सुरुवात ७ डिसेंबरपासून सुरू केली जाईल.
– जे ग्राहक आंतरराष्ट्रीय प्रवासात आहेत, किंवा शारिरीक अक्षमतेमुळे रुग्णालयात दाखल आहेत, त्यांना पडताळणीसाठी अतिरिक्त ३० दिवस दिले जातील.
– जर अंमलबजावणी संस्थांकडून किंवा आर्थिक संस्थांकडून एखादा नंबर चिह्नीत केला गेला असेल, किंवा विचित्र कॉलर म्हणून ओळखला गेला असेल तर त्याची आउटगोइंग सेवा ५ दिवसांच्या आत निलंबित केली जाईल. कोणीही पडताळणीसाठी आले नाही तर १० दिवसांत इनकमिंग आणि १५ दिवसांच्या आत नंबर पूर्णपणे डिस्कनेक्ट केला जाईल.
असे चेक करा
दूरसंचार विभागाने एक पोर्टलचे अनावरण केले आहे. त्याचा वापर करून आधारकार्डवर किती मोबाईल नंबरची नोंदणी केली आहे हे तुम्ही चेक करू शकतात. या टूलचा वापर करून कोणतीही व्यक्ती ज्या नंबरचा वापर करत नाही अशा अनधिकृत सक्रिय सिमकार्ड नंबरपासून सोप्या पद्धतीने सुटका करून घेऊ शकते. नंबर चेक करण्यासाठी पुढील सोप्या पद्धतीचा अवलंब करा.
१) tafcop.dgtelecom.gov.in या संकेतस्थळावर जा. आपला मोबाईल नंबर नोंदवा आणि Request OTP वर क्लिक करा.
२) आता तुम्हाला ६ अंकांचा वन टाइम पासवर्ड (ओटीपी) प्राप्त होईल. ओटीपी नोंदवून Validate वर क्लिक करा.
३) पुढील पेजवर तुम्हाला आधार नंबरवर नोंदवलेले सर्व मोबाईल नंबर दिसतील.
४) जर तुम्हाला वापर करत नसलेला असा कोणताही नंबर दिसला किंवा जो तुमचा नंबरच नाहीये अशा नंबरच्या पुढे टिक करा आणि Report वर क्लिक करा. जर सर्व नंबर तुमचे असतील आणि ते सुरू ठेवण्याची तुमची इच्छा असेल, तर कोणत्याही कारवाईची गरज नाही.
५) सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एका ग्राहकाला ९ मोबाईल क्रमांक बाळगण्याची परवानगी आहे. ज्यांच्याकडे एका आधारवर नऊपेक्षा अधिक मोबाईल नंबर असतील तर त्यांना एक एसएमएस पाठवला जाईल. मुद्दा क्रमांक ४ नुसार क्रिया करून अतिरिक्त नंबरना नियमित केले जाऊ शकते.