विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच आता आणखी तिसरी आणि चौथी लाट येणार, असे केवळ तज्ज्ञांकडूनच नव्हे तर राजकीय नेत्यांकडून देखील सांगण्यात येत आहे. आधीच दुसऱ्या लाटेमुळे भयभीत झालेल्या नागरिकांमध्ये आणखी तिसऱ्या आणि चौथ्या लाटेच्या शक्यतेमुळे भंयकर भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या आणखी किती लाटा येणार? असा प्रश्न आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
देशात आणि जगात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशात काल पर्यंत जवळपास ३ लाख ८o हजार कोरोना बाधित रुग्ण होते. बाधीत रुग्ण आणि मृत्यूचा आकडा काही कमी होत नाहीय राज्यातही ६० हजाराच्या आसपास आकडा आहे. मृतांचा आकडादेखील वाढला आहे. यातच आता टास्क फोर्सच्या सदस्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने खळबळ उडाली आहे.
वैद्यकीय शिक्षण संचालनलयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी बाबत माहिती देताना सांगितले की, कोरोना साथ रोगांमध्ये विषाणूची ताकद सतत वाढत असते. विषाणू स्वतःत बदल करत असतो. यामुळे कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे सध्या तरी लगेच सांगू शकत नाही. परंतु साथ रोगाच्या कितीही लाटा आल्या तरीही आपले महाराष्ट्र राज्य खंबीर असून पुरेशी वैद्यकिय तयारी करण्यात आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणखी तयारी केली जात आहे, असेही डॉ. लहाने म्हणाले.
दरम्यान, राज्यात आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सात लाखांवर गेली असली तरीही सरकारने ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची योग्य व्यवस्था केलेली आहे. कोरोनाबाधित असेल तर त्याचा मृत्यू कोरोनाबाधित म्हणूनच दाखविला जातो. कोणतीही लपवाछपवी केली जात नसल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले आहे.