विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम आता थांबला आहे. बंगाल विधानसभेत ‘खेला’ झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या झंझावातात भाजपची रणनीती सपेशल अपयशी ठरली. ममता दिदींनी पुन्हा सत्ता काबीज केली आहे. परंतु बंगालमधील विजयात मिठाचा खडा पडावा अशी स्थिती झाली आहे. तृणमूल काँग्रेसचा विजय झाला, मात्र ममता बॅनर्जी नंदिग्राम विधानसभा जागेवर परभूत झाल्या. त्यामुळे ममता दीदी पुन्हा मुख्यमंत्री कशा होणार? हा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला आहे.
असे आहेत नियम
मुख्यमंत्री होण्यासाठी विधानसभा किंवा विधानपरिषदेचा (ज्या राज्यात दोन्ही सभागृहे आहेत) सदस्य होणे आवश्यक आहे. विधानसभा किंवा विधानपरिषदेचा सदस्य नसल्यास शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात या दोन्ही पैकी एका सभागृहाचा सदस्य होणे आवश्यक आहे. नियमांनुसार सदस्य नसतानाही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेता येते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना सहा महिन्याचा वेळ मिळतो. निर्धारित वेळेत संबंधित मुख्यमंत्र्याला विधानसभा किंवा विधानपरिषदेचा सदस्य होणे अनिवार्य आहे. असे न झाल्यास मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा द्यावा लागेल.
आमदार झाल्याविना झालेले मुख्यमंत्री
नेते राज्य
उद्धव ठाकरे महाराष्ट्र
लालू प्रसाद यादव बिहार
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश
नीतिश कुमार बिहार
राबडी देवी बिहार
कमलनाथ मध्य प्रदेश
तीरथ सिंह रावत उत्तराखंड
दीदींनी स्वीकारला पराभव पण…
नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी सुवेंदू अधिकारी यांच्याविरुद्ध १९५७ मतांनी पराभूत झाल्या आहेत. त्यांनी पराभव स्वीकारला आहे. परंतु आधी आपल्याला विजयी घोषित केले आणि नंतर निवडणूक आयोगाने निर्णय बदलला असा आरोप त्यांनी केला. नंदिग्रामबाबत चिंता करू नका. नंदिग्राममध्ये लोक जो जनादेश देतील मी त्याचा स्वीकार करेन. माझी काहीच हरकत नाही. आम्ही २२१ हून अधिक जागा जिंकल्या आहेत आणि भाजप निवडणूक हरले आहे. मी जनादेशाचे स्वागत करते. परंतु मी न्यायालयात जाणार आहे. निकालाच्या घोषणेनंतर हेराफेरी करण्यात आलेली आहे. मी त्याचा लवकरच खुलासा करेन, असे ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील विजयानंतर आरोप केला आहे.