मुकुंद बाविस्कर, मुंबई
‘खरा भारत हा खेड्यात असून गावांचा विकास झाला तर पर्यायाने देशाचा विकास होईल, ‘असे सांगत महात्मा गांधी यांनी ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली होती. सहाजिकच भारतात स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षात गावांच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. परंतु अद्यापही म्हणावा तसा खेड्यापाड्यांचा विकास झालेला नाही.
देशभरातील अनेक राज्यांमध्ये काही गावेही आदर्श ग्राम म्हणून पुढे आलेली आहेत. यामागे त्या गावाचे नेतृत्व जबाबदार असल्याचे म्हटले जाते. तसेच गावकऱ्यांचे सहकार्य आणि श्रमदानही मोलाचे मानले जाते. त्यामुळेच प्रत्येक गोष्टीसाठी सरकारची जबाबदारी मानणे योग्य गोष्ट नाही, कारण मनात जिद्द असेल, इच्छाशक्ती असेल गावातील ग्रामस्यच नव्हे तर एखादा व्यक्ती ही आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. इतकेच नव्हे तर त्या गावाचे नाव केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या नकाशावर अग्रभागी उमटू शकते. याचे बोलके उदाहरण म्हणजे हरियाणातील एक गाव होय.
ही गोष्ट आहे, हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील सुई या गावाची. या गावाने चांगले कार्य करून दाखवले आहे. अर्थात यामागे एका उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्त्याची परिश्रम आणि मेहनत होती. त्यामुळेच केंद्र सरकारने दाखवलेला मार्ग अवलंबत स्वावलंबनाचा आदर्श गावात निर्माण झाला. विशेष म्हणजे सन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने येथे आदर्श गाव बनवण्यास सुरुवात झाली आणि सुई गावाचे नशीब आणि चित्र बदलले. कारण त्यावर्षी पंतप्रधान मोदी यांनी सर्व खासदारांना एक- एक गाव दत्तक घेण्याचे सांगत आदर्श बनवण्याची योजना सुरू केली, परंतु उद्योजक श्रीकृष्ण जिंदाल खासदार नसतानाही त्यांनी गाव दत्तक घेण्याचा संकल्प केला. त्यांनी या गावात विकासकामांचे नियोजन केले.
पंतप्रधानांच्या योजनेने प्रेरित होऊन सुमारे ५५ वर्षापुर्वी १९६२ मध्ये गाव सोडलेले श्रीकृष्ण जिंदाल आणि त्यांच्या कुटुंबाने हे गाव दत्तक घेतले. त्याला स्वयंप्रेरित मॉडेल गाव बनविण्याचे ठरविले आणि २०१५ मध्ये हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या मदतीने विकासकामांना सुरुवात केली. तेव्हापासून सातत्याने येथे काम सुरू असून आज गाव अविरत विकासाच्या वाटेवर आहे. त्याचेच फलित म्हणजे काल दि. १७ नोव्हेंबर रोजी महामहिम राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे गावात बांधलेल्या तलावाचे, सभागृहाचे, शाळेचे उद्घाटन करायला आले. तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते अनेक विकासकामांचे उद्घाटनही करण्यात आले.
उद्योगपती श्रीकृष्ण जिंदाल यांनी गावाच्या विकासासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे गावकरीही या कामात रात्र दिवस सहकार्य करीत आहेत. श्रीमती म्हादेई परमेश्वरी दास जिंदाल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आदर्श गाव सुरू करण्यात आले. तेव्हा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल स्वतः गावात पोहोचले. सहा वर्षांनंतर २५ कोटी रुपये खर्चून सुधारित केलेल्या या सुई गावाचे काम पाहण्यासाठी स्वत: राष्ट्रपती या गावात पोहोचले आहेत. आता श्रीकृष्ण जिंदाल त्यांच्या ट्रस्टच्या वतीने १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार आहेत.
सुई हे गाव भिवानी जिल्हा मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर आहे. हे गाव ३०० वर्षांपूर्वी वसले होते. गाव वसल्यानंतर अनेक कुटुंबे व्यवसायानिमित्त बाहेरगावी जायची. त्याच वेळी ६० वर्षापूर्वी श्रीकृष्ण जिंदाल त्यांच्या कुटुंबीयांच्या मुंबईला गेले. तेथे त्यांनी रसायनांचे कारखाने काढले. अधूनमधून गावातील वडिलोपार्जित घरीही जायचे. परंतु आपल्या गावाचा विकास करावा असे त्यांचे स्वप्न होते त्यातूनच त्यांनी अथक परिश्रम करीत अनेक प्रकल्प या गावात साकारले. त्यामुळे सुई-बलियाली रस्त्यावर नऊ एकरांचा तलाव आणि उद्यान तयार करण्यात आले आहे.
दोन एकरात एक तलाव असून त्यात चार बोटीही आहेत. गावातील नागरिक त्याचा आनंद घेतात. तसेच विश्रामगृह, उद्यान बांधण्यात आले आहे. जुनी झाडे सुस्थितीत ठेवली आहेत त्यामुळे उद्यानाच्या सौंदर्यात भर पडली आहे. येथे रात्री दिवे लावले जातात, तेव्हा उद्यान फ्लडलाइट्सने भरलेले असते. उद्यानांमध्ये झुल्यांसोबतच व्यायामासाठी मशिनही बसवण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे गावात चार उद्याने आहेत. दोन उद्याने आहेत, जिथे पूर्वी गावातील काही जण घाण टाकायचे.गावात बांधलेले वरिष्ठ माध्यमिक विद्यालयही श्रीकृष्ण जिंदाल यांनी विकसित आणि शैक्षणिक साधनांनी समृद्ध केले. यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसेच नवीन १० खोल्या बांधल्या. येथेच संगणक प्रयोगशाळा बांधण्यात आली असून ग्रंथालय व सायन्स लॅब बांधण्यात आली.
श्रीमती म्हादेई परमेश्वर दास जिंदाल चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक श्रीकृष्ण जिंदाल यांनी सांगितले की, सुई गावात तीन एकरात सभागृह बांधण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या सभागृहात एक नाट्यगृह बांधण्यात आले असून त्यात ४०० हून अधिक प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आहे. त्यात चित्रपटही दाखवता येतो. याशिवाय तीन हॉल व खोल्या बांधण्यात आल्या आहेत. गावात अनेक मोठ्या ठिकाणी सोलर सिस्टीम बसविण्यात आली आहे.
गावातील बहुतांश गल्ल्या पक्क्या रोडच्या बनल्या आहेत. तसेच गाव स्वच्छ राहावे, यासाठी गावात स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यासोबतच घंटागाडी (ट्रॅक्टर व डंपर ) देण्यात आल्या आहेत. गावात प्रवेशासाठी चार दरवाजे आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन गावाला ‘मॉडेल व्हिलेज ‘ बनवण्यात आले. सुई हे माझे गाव असूनआम्ही ते पुढे नेऊ. देशाच्या नकाशावर ते वेगळे दिसेल. आता मी माझ्या नोकरी व्यवसायातून निवृत्त झालो आहे. आता संपूर्ण लक्ष गाव आणि समाजातील योगदानावर राहणार आहे.