मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गृहनिर्माण संस्थांनी करायच्या मानीव अभिहस्तांतरणाची (डीम्ड कन्व्हेयन्स) प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सहकार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मानीव अभिहस्तांतरण अभियानातून’ गृहनिर्माण सोसायट्यांना नोंदणीसाठी संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमात घेण्यात आलेल्या मुलाखतीतून सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली आहे.
गृहनिर्माण संस्था ज्या जागेवर उभी आहे, ती जागा गृहनिर्माण संस्थेच्या नावावर असणे आवश्यक असून सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावाने जागेची मालकी आणि हक्क विधी-नियमाने हस्तांतरित होणे गरजेचे आहे. कायदेशीर पद्धतीने गृहनिर्माण संस्था उभी असलेली जागा गृहनिर्माण संस्थेच्या नावावर होण्याच्या प्रक्रियेला ‘मानीव अभिहस्तांतरण’(डीम्ड कन्व्हेअन्स) म्हणतात.
मानीव अभिहस्तांतरण झाल्याशिवाय गृहनिर्माण संस्थेकडे त्या जागेचा मालकी हक्क येऊ शकत नाही. भविष्यात गृहनिर्माण संस्थांची पुनर्विकास प्रक्रिया सुलभ होण्यासाठी ही प्रक्रिया किती महत्त्वाची आहे. तसेच या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी कशा प्रकारे अर्ज सादर करावा अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवरील माहिती, सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, मंगळवार, दि. 18 आणि बुधवार दि. 19 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी घेतली आहे.
Housing Society Apartment Deemed Conveyance Campaign