मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत राज्यात घरेलू कामगार म्हणून काम करणाऱ्या आणि 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार असल्याची माहिती, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली.
‘जागर मुंबईचा’ या अभियानांतर्गत कामगारांसाठी चेंबूर येथे भाऊबीज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे, आमदार ॲड.अशिष शेलार, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना संस्थापक-अध्यक्ष सुभाष मराठे, नगरसेविका आशाताई मराठे आदी उपस्थित होते.
घरेलू कामगार हा आपल्या कुटुंबाचा भाग असतो. विभक्त कुटुंब पद्धतीत व बदलत्या जीवनशैलीमध्ये त्यांचे कुटुंबात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यामुळेच या घरेलू कामगारांचे जीवनमान हे आर्थिक तसेच सामाजिक स्तरावर अधिक उंचावण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शासनाने महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना आर्थिक लाभ देण्यात येतो. पुढील काळात नोंदणीसाठीचे शुल्क नाममात्र करण्यात येणार असून त्यासोबतच आयुष्यभर लोकांची सेवा करणारे आणि समाजाचा अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या घरेलू कामगारांसाठी ज्यांचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा सर्व नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे सन्मान धन योजनेअंतर्गत 10 हजार रुपयाचे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
House Maid 10 Thousand Rupees Help Labour Minister