मुंबई – कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्याचे ठरले. वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या वेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होतील. हॉटेल्स आणि दुकानांच्या वेळांबाबत राज्य सरकारने आदेश काढले आहेत.
कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्णसंख्या कमी होतांना दिसते आहे. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहेही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांच्या देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम असून नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. कोरोनावरील उपचारांसाठी जगात नवनवीन प्रयोग होत असून येणाऱ्या नवीन औषधांच्या बाबतीतही त्यांची परिणामकारकता, किंमत, उपलब्धता याबाबत आत्तापासूनच माहिती घेत राहावी व संबंधितांच्या संपर्कात राहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दुकाने आणि हॉटेल्सच्या वेळांबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, आता दुकाने आणि मॉल्स हे रात्री ११ वाजेपर्यंत तर हॉटेल्स व रेस्टॉरंट हे रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहू शकणार आहेत. सरकारने काढलेले आदेश असे
Restaurants & eateries can now remain open till 12 midnight, while shops and establishments can stay open till 11 pm with immediate effect. pic.twitter.com/HqPXctl620
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 19, 2021