विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांकडून दिल्या जात असलेल्या हॉटेल पॅकेजवर केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्र शासीत प्रदेशांना पत्र लिहून अश्या लसीकरण केंद्रांना तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी लसीकरणातही नागरिकांना लुटणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अप्पर सचिव डॉ. मनोहर अगनानी यांनी यासंदर्भात सर्व राज्यांच्या सचिवांना पत्र लिहीले आहे. काही खासगी रुग्णालये लसीकरणासाठी हॉटेल्ससोबत मिळून पॅकेज देत आहेत. याअंतर्गत हॉटेल्समधील लक्झरी सुविधांसोबत लसीकरणाची मोहिनी घातली जात आहे.
अगनानी यांनी सांगितले की लसीकरणासाठी केवळ चारच पर्याय उपलब्ध आहेत. पहिले सरकारी लसीकरण केंद्र, दुसरे खासगी रुग्णालयांद्वारा संचालित खासगी लसीकरण केंद्र, तिसरे सरकारी कार्यालयांमधील केंद्र तसेच खासगी कंपन्यांमध्ये खासगी रुग्णालयांद्वारा संचालित लसीकरण केंद्र आणि चौथे ड्राईव्ह इन लसीकरण. या चार पर्यायांच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही पर्याय सरकारने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध करून दिलेला नाही. मात्र देशातील काही खासगी रुग्णालये नागरिकांना आकर्षित करण्यासाठी पंचतारांकित रुग्णालयांमध्ये लसीकरण करीत आहेत.
कायदेशीर कारवाईचे निर्देश
अगनानी यांनी सांगितले की या चार पर्यायांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याच ठिकाणी लसीकरण केले जाऊ शकत नाही. त्यामुळे पंचतारांकित हॉटेल्समध्ये लसीकरण करणे हे राष्ट्रीय कोरोना लसीकरण मोहिमेच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन आहे. असे लसीकरण केंद्र तातडीने बंद करावे व संस्थांवर कायदेशीर कारवाई करावी, असे अगनानी यांनी म्हटले आहे.