नाशिक – राज्य सरकारने कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता देताना दुकानदारांना दिलासा दिला मात्र हॉटेल व्यवसायाची वेळ तेवढीच ठेवण्यात आली आहे. सरकारने हॉटेल व्यवसायालाही वेळ वाढवून द्यावी , या मागणीसाठी शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी आंदोलन केले. हे आंदोलन त्यांना महागात पडले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंदोलनासाठी कुठलीही परवानगी न घेता हॉटेलला रात्री दहापर्यत वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या १३ हॉटेल चालकाविरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. वेदांशु पाटील, जय पवार, नितीन घेगडमल, श्रीकांत बोरसे, स्वप्नील येनडाईत, रॉबीन रिचर्ड डिसोजा, हेमंत कुलकर्णी, रोहीत कर्डीले, विकी बेलगावकर,
हार्दीक पटेल, निखील पालवे, पद्मनाभ मढीवाल आणि निलेश धुळे अशी गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल व्यवसायिकांची नावे आहेत. बुधवारी (ता.४) सकाळी साडे अकराला त्यांनी कर्मयोगी नगर येथील रणभूमी क्रिकेट मैदानाजवळ द नाशिक रेस्टॉरन्ट क्लस्टर येथे रात्री दहापर्यत हॉटेलच्या वेळा वाढवून द्याव्यात या मागणीसाठी शासनाचा मनाई
आदेश डावलून आंदोलन करीत शासनाविरोधात घोषणाबाजी केली म्हणून पोलिस नाईक कैलास निबेंकर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
एटीएम कार्ड बदलून ७० हजाराला गंडा
नाशिक – वडनेर पाथर्डी रोडवरील एटीएम केंद्रात कार्डाची आदलाबदल करीत तिघा संशयितांनी एकाला ७० हजार ६२३ रुपयाला गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला. सोमवारी (ता.२) सायंकाळी पावने सातला सप्तश्रृंगी हॉस्पीटल जवळील एटीएम केंद्रात हा प्रकार घडला. कैलास युवराज पाटील (वय ४०, ज्ञानेश्वरनगर पाथर्डी फाटा) यांच्या तक्रारीवरुन इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोघा संशयिताविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी कैलास पाटील हे सोमवारी सायंकाळी सप्तश्रृंग हॉस्पीटल येथील एटीएम केंद्रात असता एटीएम केंद्रात घुसलेल्या दोघा संशयितांनी कैलास पाटील यांच्या एटीएम कार्डाची आदलाबदल केली त्यांच्या खात्यातून ७० हजार ६२३ रुपये काढून गंडविले.